विद्यार्थी व साहित्य उपक्रम

मॉम

1972 मध्ये पुंडेसर मॉडर्न महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्रा. सीताराम रायकर अध्यक्षस्थानी असलेल्या कलामंडळामध्ये सरांना एक सदस्य म्हणून निवडण्यात आले आणि त्यांच्याकडे कॉलेजच्या वॉल पेपरचे म्हणजे हस्तलिखित भित्तिपत्रकाचे काम देण्यात आले. मॉडर्न महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही विद्याशाखा शिकवल्या जात. मॉमचे प्रतिनिधी म्हणून मुकुंद कडूसकर आणि बाबा सिद्धये हे दोन वाणिज्य विद्या शाखेचे विद्यार्थी निवडून आलेले होते. पुंडेसरांनी ज्यांना ज्यांना या हस्तलिखितात काम करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांची बैठक घेतली आणि सहासात मुलामुलींचे मिळून एक संपादक मंडळ बनवले. पुंडेसरांनी विद्यार्थ्यांना दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या, भित्तिपत्रक 12 पानांचे असावे आणि ते न चुकता प्रत्येक महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला फलकावर प्रसिद्ध केले जावे. मॉमसाठी त्यांनी कॉलेजच्या मागे लागून एक स्वतंत्र शोकेस तयार करून घेतली त्या शोकेसमध्ये मॉमखेरीज इतर नोटिसा वगैरे लावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यास महाविद्यालयाच्या रजिस्ट्रारला सांगण्यात आले. प्रत्येक अंक तयार झाल्यावर सर तो पाहणार व मगच अंक लावला जाणार हेही सरांनी संपादक मंडळाला बजावून सांगितले. अंक निघू लागले. सुंदर अक्षर आणि चित्रसजावट असणारे अंक विद्यार्थ्यांना आकृष्ट करू लागले.

1972 हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या रजत महोत्सवाचे वर्ष. त्यामुळे सरांना विद्यार्थ्यांना विशेषांक काढण्यास सुचविले. मॉमच्या विशेषंकाच्या मजकुराकरिता आणि विशेषतः मुखपृष्ठाकरिता विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुखपृष्ठासाठी अपेक्षेप्रमाणे अतिशय कमी प्रतिसाद लाभला. एकूण 7 चित्रे आली होती त्यातील एक चित्र अप्रतिम होते. ब्रिटीश राज्याचा पुसट होत जाणारा गुलाबी-बैंगणी रंग आणि स्वातंत्र्याचा प्रभावशाली सोनेरी रंग यांचे मिश्रण तर त्या चित्रात होतेच, पण पायातून निखळून पडलेले साखळदंडही होते. चित्रकार होता ज्यूनिअर बी.एससी.चा विद्यार्थी दीपक संकपाळ. या मुखपृष्ठामुळे आणि अंकातील स्वातंत्र्यविषयक कवितांमुळे अंक गाजला. इतर कॉलेजमधील संपादक मंडळाचे विद्यार्थी अंक पाहण्यास आले. कडूसकर-सिद्धये अशा विद्यार्थ्यांना सरांकडे घेऊन येत असत. मग त्यातून दुस-या सत्रामध्ये सर्व महाविद्यालयातील भित्तिपत्रकांचा मिळून एकत्रित अंक काढावा असे सरांनी विद्यार्थ्यांना सुचवले आणि त्याचा खर्च मॉडर्न महाविद्यालय करेल असेही सुचवले. तो अंक दुस-या सत्रात खरोखर निघाला आणि प्रत्येक महाविद्यालयात 4-4 दिवस प्रदर्शित करण्यात आला. अंकाचे नाव होते एपिमॉनिँएसटी. अभिनव कला महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, गरवारे आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, एस.पी. कॉलेज आणखीनही दोन महाविद्यालये होती यांच्यातर्फे निघत असलेल्या भित्तिपत्रकांच्या नावातले पहिले अक्षर घेऊन या अंकाचे नाव तयार केले होते.

मॉमचा उपक्रम सरांकडे ओळीने सहा वर्षे होता. सरांनी तो उपक्रम लोकप्रिय करण्यासाठी निरनिराळ्या कल्पनांचा आश्रय घेतला होता. 1974 साली मॉमचे संपादक, लेखक, सजावट करणारे अशा सगळ्यांची सहल भाज्याला नेली. तिथेच संपूर्ण अंकाचे लेखन केले. सहलीच्या आनंदाबरोबरच फायदा असा झाला की, भाज्यातल्या निसर्गाची निवडक छायाचित्रे मॉममधे झळकली. 1976 साली भीमाशंकरला सहल गेली होती तेव्हा भीमराव कुलकर्णी आणि शंकर नवलगुंदकर हे विद्यार्थ्यांबरोबर होते. एका विद्यार्थिनीने या सहलीवर विनोदी ढंगाने लेख लिहिला होता त्याच्या सोबत तिने काढलेली काही निवडक छायाचित्रे दिली होती. त्यात भीमराव आणि नवलगुंदकर यांच्या एकत्रित छायाचित्र होते त्याखाली तिने लिहिले होते भीमा आणि शंकर. अशा गमतीजमतीही होत होत्या. त्या वर्षीच्या संपादकमंडळावर सर खूप खूश होते.

मॉडर्न महाविद्यालयामध्ये मॉमतर्फे आंतरमहाविद्यालयीन कविसंमेलने तसेच कथाकथने होत असत. त्या काळातलीच एक आठवण अशी आहे की, लोकसत्ता पुणे, चे संपादक मुकुंद संगोराम हे त्याकाळात मॉमचे निवडून आलेले मुख्य प्रतिनिधी होते. त्यांनी चक्क तीन दिवसांचे पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थीविद्यार्थिनींचे साहित्य संमेलनच घेतले होते. यात साहित्य संमेलनाप्रमाणेच परिसंवाद, कथाकथन, एकांकिका इत्यादी गोष्टी होत्या. ज्येष्ठ साहित्यिकदेखील या संमेलनाला हजेरी लावून जायचे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु देवदत्त दाभोळकर यांना संगोराम आणि त्यांचे मित्र यांनी आपल्या या संमेलनात यावे अशी विनंती केली होती. विद्यार्थ्यांसाठी ते आवर्जून आले होते. दहा मिनिटांसाठी ते आले होते प्रत्यक्षात मात्र चाळीस मिनिटे ते थांबले होते आणि मुलामुलींचे कार्यक्रम पाहून ते अगदी आनंदून गेले आणि चाळीस मिनिटे त्यावर ते बोलले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी साहित्यिकांसाठी व विद्यार्थी श्रोत्यांकरिता आयोजिलेले हे पहिलेच संमेलन आहे असे म्हणून संगोराम आणि त्यांचे मित्र यांचे कौतुक केले होते.

मॉमच्या निमित्ताने पुंडेसरांचा परिचय पुण्यातील युवा साहित्यिक प्रज्ञेशी झाला. मुकुंद टांकसाळे, प्रसन्नकुमार अकलूजकर, वि. द. कुलकर्णी, अरुणा ढेरे अशी कितीतरी नावं सांगता येतील. मॉडर्न महाविद्यालयातील सुरेशचंद्र पाध्ये व मुकुंद संगोराम विद्यार्थी वृत्तपत्रव्यवसायाकडे आणि दीपक संकपाळ व्यावसायिक चित्रकलेच्या क्षेत्रात स्थिर झाले हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे.

मॉमचा महिला विशेषांक – पुंडे सरांचे मनोगत

1973 किंवा 1974ची गोष्ट. नेहमीप्रमाणे फलकावर मॉमचा नवा अंक लागला होता. मी एक परिपाठ ठेवला होता. ज्या दिवशी अंक लागे त्या दिवशी माझ्या सवडीप्रमाणे मी तो जाऊन प्रत्यक्ष पाहत असे. विद्यार्थी विद्यार्थिनींचे घोळके उभे राहून मॉम वाचत असत. वाचता वाचता ते अभिप्रायही देत असत. मी मागे एका कोप-यात उभा असे. त्यांचे ते अभिप्राय माझ्या कानावर पडत असत. असाच तेव्हा उभा होतो तेव्हा सातआठ विद्यार्थिनी तो अंक वाचत होत्या त्यातली एक मुलगी म्हणाली, “सर्व लेख मुलांचेच. मुलींचा एकही नाही. मुलींना लिहिता येत नाही असं समजतात की काय?” मी पुढे जाऊन विचारलं त्या मुलींना, “तुमच्यापैकी कोणी कधी साहित्य दिलं होतं का ?“ पण त्या मुली घाबरून चटकन निघून गेल्या. मग मी विद्यार्थिसंपादकांना बोलावलं आणि एक छोटी बैठक घेतली. त्यांना महिला विशेषांकाची कल्पना सुचवली. अंकाचं सर्वच्या सर्व कामं मुलींनीच करायची हे सांगितले. बीएस्सी सिनिअरच्या वर्गातल्या दोन मुलींवर सर्व जबाबदारी दिली. ही गोष्ट त्या वर्षीच्या ऑक्टोबरमधली. अंक जानेवारीत काढायचा असे ठरले. भागवत आणि रणदिवे ही या दोन मुलींची नावे. त्यांनी संक्रांतीच्या दुस-या दिवशी सायंकाळी ‘महिला विशेषांक’ प्रकाशित केला. प्रकाशन माझ्या आठवणीप्रमाणे स. प. महाविद्यालयातील प्राध्यापिका नरवणे यांच्या हस्ते झाले होते. गंमत म्हणजे मुलींनी चक्क हळदीकुंकवाचा समारंभ करून, ओट्या भरून, वाणे देऊन तिळगुळही वाटला. बहुतेक मुली नऊवारी साडी नेसून आल्या होत्या. हा अंक सर्व महाविद्यालयातील साहित्यप्रेमी मुलामुलींनी येऊन मुद्दाम पाहिला होता, हे विशेष. एकदोन वृत्तपत्रात ‘महाविद्यालयीन’ सदरात त्याची प्रसिद्धीही झाली होती.

ठळक क्षण : यशाचे व आनंदाचे

  1. शालान्त परीक्षेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मुलामुलींमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी म्हणून महर्षी मो. वा. दोंदे पारितोषिक प्राप्त.
  2. 1857 साली मुंबई पब्लिक सर्व्हिस कमिशनने मुंबई सरकारच्या सेक्रेटरिएटमधील क्लार्कच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये पहिल्या शंभरातील एक उमेदवार (क्र. 79वा). खेडेगावात शिक्षण झाल्याने अशा स्पर्धा परीक्षांकरिता मुंबईत किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग असतात याची माहितीही नव्हते.
  3. सेक्रेटरिएटमध्ये नोकरी करीत असताना 1964 मध्ये असिस्टंट ग्रेडवर नियुक्ती. नियुक्तीनंतरच्या डिपार्टमेंटल एक्झामिनेशनमध्ये (1966) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण. ही परीक्षा 1952 साली सुरू झाली होती. तोवरच्या सर्व उमेदवारांपेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्याने एक नवे रेकॉर्ड प्रस्थापित झालेले होते.
  4. गंमत शब्दांची या पुस्तकाला 2010चा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा दि. के. बेडेकरांच्या नावाचा पुरस्कार.
  5. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कै. श्री. ज. जोशी पुरस्कार प्राप्त.
  6. गावगाडा ः शताब्दी आवृत्ती (1916) या संपादित ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त.
  7. वाङ्मयेतिहासाची संकल्पना या विषयाचा विशेष अभ्यास. या विषयावर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथामुळे, लेखनामुळे हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एक स्वतंत्र अभ्यासविषय म्हणून शिकविला जाऊ लागला. वाङ्मयेतिहास म्हणजे डॉ. द. दि. पुंडे हे समीकरणच तयार झाले आणि आजपावेतो ते टिकून राहिले आहे.
  8. भयंकर सुंदर मराठी भाषा या ललित लेखसंग्रहाला वेगवेगळ्या साहित्यसंस्थांकडून चार पारितोषिके मिळाली आहेत.

मी आणि वाङ्मयेतिहास

वाङ्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान किंवा वाङ्मयेतिहास विचार हा माझ्या अभ्यासाचा खास विषय म्हणता येईल. विषय मला कोणी सुचविला सांगितलेला नाही. तो माझ्या मनात येण्यास काही घटना घडल्या इतकेच काय ते खरे.

मी मुंबई विद्यापीठाचा एम.ए.चा विद्यार्थी. कै. अनंत काणेकर एम.ए.चे दोनेक तास घेत. खरे तर ते कोणताही विशिष्ट विषय शिकवित नसत. पण त्यांचा तास म्हणजे वाङ्मय, साहित्यिक, कलाकृती, वाङ्मयीन वातावरण इत्यादींसंबधीच्या मुक्त गप्पागोष्टी असत. ते एकदा बोलता बोलता वाङ्मयाचा प्रवाह यावर बरेच काही अन् नेहमीप्रमाणे सर्वांगसुंदर बोलले. त्यांच्या विवेचनावर मी खूप दिवस विचार करीत राहिलो. एम.ए.ला वाङ्मयेतिहासाचा एका पेपरचा अभ्यासक्रम होताच त्या विषयाचा प्रवाह म्हणून मी विचार करू लागलो. त्यावेळी याबाबत मी एक प्राथमिक विधान मनात करून ठेवले होते, ते असे- वाङ्मयेतिहास हा एखाद्या प्रवाहासारखा असतो, मागील वाङ्मय स्वतः सामावून घेत आणि नव्याचे स्वागत करीत हा प्रवाह समृद्ध होत असतो.

मी एम.ए. प्रथम श्रेणीत पास झालो त्यावेळेस आमचे आदरणीय प्रोफेसर व. दि. कुलकर्णी यांचे अभिनंदनाचे पत्र आले होते. मी त्यांना नमस्कार करायला गेलो त्यावेळी त्यांनी बोलण्याच्या ओघात एम.ए.चा कोणता विषय तुमच्या सर्वाधिक आवडीचा आहे मी तात्काळ सांगितले वाङ्मयेतिहास. त्यावर सरांनी आश्चर्य व्यक्त केले होते आणि ते बरोबरच होते. कारण बहुतांश अभ्यासक वाङ्मयसिद्धान्त किंवा वाङ्मयप्रकाराचा अभ्यास हा विषय आवडीचा असल्याचे सांगत (आजही तसंच सांगताना दिसतात) आदरणीय कुलकर्णीसरांनी वाङ्मयेतिहासावर एक टिपण लिहिले होते. त्याची एक प्रत त्यांनी मला दिली. पुढे मी वाङ्मयेतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा रीतसर अभ्यास केला तेव्हा प्रचंड सामग्री गोळा केली. हे टिपण म्हणजे त्याची सुरुवात होती हे त्यावेळी मला माहीत नव्हते.

मी मॉडर्न महाविद्यालयात 1972 साली रुजू झालो. विभागप्रमुखांनी नवीन येणा-या प्राध्यापकासाठी बी.ए. स्पेशलला वाङ्मयेतिहास शिकवण्याचे काम राखून ठेवले होते. मी तो विषय पुरेशा तयारीनिशी शिकवू लागलो. मी प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटे चर्चासत्र घेत होतो. बी.ए. स्पेशलच्या विद्यार्थ्यांसाठी मी वाङ्मयेतिहासाची रचना या विषयावर चर्चासत्र घेतले होते. पुढे काही वर्षांनी मी पुणे विद्यापीठात एम.ए.ला पाहुणा प्राध्यापक म्हणून शिकवू लागलो तेव्हाही मला योगायोगाने सुरुवातीला वाङ्मयेतिहासच शिकवायला सांगितले गेले होते. मी हा विषय माझ्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न केला. माझे हे उपक्रम त्याकाळात उपलब्ध असणा-या वाङ्मयेतिहासासंबंधीच्या असमाधानातून जन्मलेलेच म्हणायला हवेत. वाङ्मयेतिहासाच्या स्वरुपाचा मूलभूत अभ्यास करावा असे हे उपक्रम करीत होतो तेव्हा सुचले नव्हते, ते सुचले 1981-82 साली. 1980 ते 1982 या कालखंडात मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 6 च्या कामात साहाय्यक संपादकक म्हणून काम करत होतो. प्रा. गो. म. कुलकर्णी आणि डॉ. व. दि. कुलकर्णी हे दोघेही या खंडाचे संपादक म्हणून काम बघत होते. त्यांना मी मदत करत होतो. काम करताना माझ्या असे लक्षात आले की, खंडात लेखन करण्यासाठी ज्या लेखकांना निमंत्रित केले होते त्यांच्या वाङ्मयेतिहासविषयक कल्पनांमधे बरीच संदिग्धता आहे. मला स्वतःला असे वाटू लागले की, वाङ्मयेतिहासविषयक संकल्पना निश्चित करायला हवी. तसे मी आदरणीय गो.म. सरांना आणि व. दि. सरांना बोलूनही दाखवले. त्यावेळी असे ठरले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या वर्षीच्या अमृतमहोत्सवानिमित्त वाङ्मयेतिहासाची संकल्पना या विषयावर चर्चासत्र घ्यावे. म्हणून मी या निमित्ताने म.सा.पकरिता वाङ्मयेतिहासाची संकल्पना या विषयावर एक सैद्धान्तिक व दुसरे उपयोजित अशी दोन चर्चासत्रे घ्यावीत असे सुचविले. म.सा.परिषदेने ही योजना मान्य केली. त्यासंबंधीची बातमीही लगेच वृत्तपत्रात छापून आली होती. ती वाचून डॉ. अशोक केळकर यांनी हैदराबाद येथील सेंटर फॉर इंग्लिश अॅण्ड फॉरेन लँग्वेजेस मधील डॉ. श्रीनिवास प्रधान आणि हैदराबादचेच ओरिएण्ट लाँगमन कंपनीचे डायरेक्टर डॉ. सुजीत मुखर्जी यांची नावे आवर्जून व आग्रहपूर्वक सुचविली. या चर्चासत्रात डॉ. अशोक केळकर आणि मॉडर्न महाविद्यालयातील इंग्लिश विभागाचे विभागप्रमुख प्रा. सीताराम रायकर या दोघांनी अतिशय मदत केली. पहिले चर्चासत्र 6 व 7 नोव्हेंबर 1981 असे दोन दिवस वाङ्मयेतिहासाची संकल्पना या विषयावर घेतले गेले होते. त्यामध्ये व्यक्त झालेल्या विचारांचा पाठपुरावा करण्याच्या हेतून दुसरे चर्चासत्र 1 ते 3 मे 1982 असे तीन दिवस आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची मांडणी या विषयावर घेतले गेले. मी अनेक विषयांवरील अनेक चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. परंतु 6-7 नोव्हेंबरचे चर्चासत्र अगदी सर्वार्थाने सर्वांगसुंदर झालेले होते. मी स्वतः या चर्चासत्राबाबत अत्यंत समाधानी होतो.

याच काळात आदरणीय गो.म.सरांचा व माझा अशाप्रकारचा वाङ्मयीन स्नेहबंध जमला की त्यातून आमचे खरोखरच गुरुशिष्याचे नाते निर्माण झाले. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात राहात असू. आमच्या गप्पा म्हणजे सततच्या वाङ्मयीन चर्चाच असत. मी वाङ्मयेतिहासाचा तत्त्वविचार कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकलो. अगोदर उल्लेख केलेल्या चर्चासत्रांतील निबंधाचे पुस्तक करण्याचे ठरल्यावर त्या पुस्तकाची संपूर्ण संहिता तयार करून गो.म. सरांना दिली. तेव्हा ते म्हणाले, “दोन्ही चर्चासत्रे व्हर्च्युअली (हा त्यांचा शब्द माझ्या चांगला लक्षात आहे) तुम्ही घेतली, पुस्तकाची संहिता तुम्ही तयार केली, इतर मौलिक लेख जमवले, परिशिष्टे तयार केली तेव्हा संपादनही तुम्हीच करा.” अनपेक्षितपणे आलेल्या या जबाबदारीने मी अवाक झालो, पण गो.मं.ची आज्ञा म्हणजे गुरुची आज्ञा. त्यांना चटकन नाही म्हणण्याचे धैर्य झाले नाही. मित्रमंडळींशीही याबाबत चर्चा केली, तर त्यांचेही हेच म्हणणे पडले की, मीच संपादन केले पाहिजे. या पुस्तकामुळे जवळजवळ संपू्र्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात वाङ्मयेतिहासविचाराचा अंतर्भाव झाला. परंतु संपूर्ण एका सत्राचा अभ्यासक्रम सुरू करून वाङ्मयेतिहास विचाराला स्वतंत्र अभ्यासशाखेचा सर्वप्रथम मान दिला तो डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनीच.

माझा वाङ्मयेतिहासासंबंधीचा विचार वेगाने सुरू झाला तो 1992-93 साली प्राज्ञ पाठशाळा मंडळाने मराठी विश्वकोशामध्ये वाङ्मयेतिहासविचार या विषयावर नोंद लिहिण्यासाठी निमंत्रित केले तेव्हापासून. या लेखनामुळे माझा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला आणि आत्मविश्वासही वाढला. या कामाच्या दोनेक वर्ष आधी मला विद्यापीठ अनुदान आयोगाचा वाङ्मयेतिहासाची संकल्पना या विषयावरील अभ्यासप्रकल्प मंजूर झाला होता. याच काळात माझी डॉ. गणेश देवी आणि डॉ. सुजीत मुखर्जी या दोन आंतरराष्ट्रीय टीकाकारांशी परिचय झाला होता. डॉ. गणेश देवी यांच्या आफ्टर अॅम्नेशिया या ग्रंथात त्यांनी वाङ्मयेतिहासाची संकल्पना या पुस्तकाचे विवेचन केलेले आहेच पण पुढे ते लिहितात, “ The only notable publication on this subject in Indian English is Sujit Mukharji’s ‘Towards Literary History of India (Simla 1975)’ and the only book in Marathi is the one edited by Dattatraya Punde ‘Vangmayetihasachi Sankalpana (Pune 1986)’ त्यानंतर 1998 मध्ये डॉ. देवींचे ऑफ मेनी हिरोज हे पुढंचे पुस्तक आले. यातदेखील माझ्या वाङ्मयेतिहासाची संकल्पना या पुस्तकाबाबत चर्चा आहे.

एकंदर अशा रीतीने वाङ्मयेतिहास विचार आता जवळजवळ सर्व विद्यापीठिय अभ्यासक्रमात स्थिरावला आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. एखादा तरी विद्यार्थी वाङ्मयेतिहासविचाराच्या अभ्यासाकडे वळेल अशी मला आशा आहे.