काळे सरांविषयी मनोगत

माझे ज्येष्ठ सहकारी डॉ कल्याण काळे
1995 मध्ये सा. फु. पुणे विद्यापीठात मी प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. हा अर्ज माझे मित्र डॉ. पी. जी. जोगदंड (समाजशास्त्र विभाग) यांच्या हस्ते मी पाठविला होता. पाठवितांना त्यांना एक सांगितले होते की, मराठी विभागातील कुणा शिक्षकाने अर्ज केला असेल तर त्यांनी तो अर्ज सादर करू नये. कारण येथे डॉ. कल्याण काळे हे अनेक वर्षांपासून प्राध्यापक आहेत, हे मला माहीत होते. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की डॉ. कल्याण काळे यांनी अर्ज सादर केला नव्हता. माझा अर्ज सादर करण्यात आला. पुढे रीतसर मुलाखती होऊन मी विभागात रुजू झालो. येथून पुढे डॉ. कल्याण काळे यांच्या सहकार्याने मी विभागात रुळत गेलो. ते मितभाषी आहेत. परंतु आवश्यक तेव्हा फार न बोलता नेमका सल्ला देत. विभागातील सर्व बारीकसारीक कामे फार मनःपूर्वक करीत. हे सारे माझ्यासाठी जरा नवलाचे होते. कारण माझ्या पूर्वी ते विभागप्रमुख म्हणून काम करीत होते. मी रुजू झाल्यानंतर विद्यापीठाने मला विभागप्रमुख म्हणून नेमले. ते ज्येष्ठ होते. म्हणून मी त्यांना म्हटले की, ''आपण आता काही दिवसात निवृत्त होणार आहात. तोपर्यंत विभागप्रमुख म्हणून आपणच कार्यभार पहावा.'' आणखी कुणी असता तर त्याने तो प्रस्ताव स्वीकारला असता. परंतु त्यांनी ते मान्य केले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यभार रीतसर माझ्याकडे सोपविला व मला विभागाच्या कामात मदत करू लागले.

मराठी विभागात येण्यापूर्वी माझी त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती. एखाद दुसरी भेट झाली असेल. माझ्या स्मरणाप्रमाणे त्यांना एकदा औरंगाबादला मी बोलावलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापनेपासून भाषाशास्त्र शिकविले जात होते. प्राचार्य ठाले आणि माझ्या पुढाकाराने तेथे आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यासक्रम सुरू झाला. या विषयाचा परिचय व्हावा म्हणून आम्ही डॉ. अंजली सोमण, डॉ. द. दि. पुंडे आणि कल्याण काळे यांना व्याख्यानांसाठी निमंत्रित केले होते. डॉ. रमेश धोंगडे यांनाही बोलावल्याचे आठवते. त्या व्याख्यानांच्या निमित्ताने डॉ. कल्याण काळे औरंगाबादला आलेले होते. भेटी झाल्या होत्या. पण फारसा परिचय नव्हता. मी पुण्याला आल्यानंतर मात्र खरा परिचयच नाही तर स्नेह निर्माण झाला. आज महाराष्ट्रात भाषाविज्ञानामधील जे अगदी थोडे तज्ज्ञ आहेत, त्यात डॉ. कल्याण काळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी भाषाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून डेक्कन कॉलेजमध्ये, पश्चिम भाषा विभागीय केंद्रात काम केलेले होते. पुढे सा. फु. पुणे विद्यापीठात आल्यानंतरही त्यांचे भाषाविज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन चालूच राहिले.
भाषाविज्ञानाबरोबरच संतसाहित्यही त्यांच्या आस्थेचा आणि सूक्ष्म अभ्यासाचा विषय आहे परांडयाच्या हंसराज स्वामींच्या साहित्यावर त्यांनी प्रबंध लिहिला आहे. संत साहित्याचा त्यांनी केवळ अभ्यासच केला असे नाही तर संत साहित्यातून प्रकट केलेली जीवनमूल्येही त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यांनी मुरवून घेतलेली आहेत. त्यामुळे त्यांचे वर्तन अतिशय सात्त्विक असते. सगळ्या विकारांच्या पलीकडे गेलेले हे व्यक्तिमत्व आहे, असे त्यांच्या सहवासात असतांना सतत जाणवत राहते. संत साहित्याचा अभ्यास करता करता एखादा अभ्यासक कसा संतत्व धारण करू शकतो, याचे उदाहरण म्हणून डॉ. कल्याण काळे यांच्याकडे पाहता येते.

- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

विद्वान सहकारी
नम्रता, विद्वत्ता आणि सुजनता हे तिन्ही गुण एकत्र येणे अतिशय दुर्मिळ. कारण विद्वत्ता असते तिथे नम्रता नसते. अहंकार असतो. आणि अहंकारी माणसापाशी सुजनता आढळणे दुर्मिळच. डॉ. कल्याण काळे यांच्यापाशी मात्र हे तिन्ही सद्गुण आहेत. ' हंसराज स्वामी: साहित्य आणि तत्त्वविचार' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. या विषयावर संशोधन करत असताना त्यांचे सारे तत्त्वज्ञान काळे यांनी आपल्या व्यक्तिमत्वात मुरवले आहे. साहजिकच त्यांची प्रत्येक उक्ती आणि कृती यामागे एक अाध्यात्मिक डूब असते.

डॉ. काळे यांच्याशी माझा परिचय 'भाषाविज्ञान' या विषयामुळे झाला. 1973-74 पासून श्री. ना. दा. ठाकरसी विद्यापीठाने ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान' या विषयाचा समावेश मराठीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात केला. मी 1981 साली पुण्याच्या श्री. ना. दा. ठा. कला महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाले. मला भाषाविज्ञान हा विषय शिकवण्यासाठी देण्यात आला. तेव्हा असे लक्षात आले की वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाची आधुनिक पद्धतीने मांडणी करणारी पुस्तके मराठीमध्ये नाहीत. ही अडचण मी तेव्हाचे आमचे प्राचार्य डॉ. हे. वि. इनामदार यांच्यापाशी बोलून दाखवली. त्यांनी सत्वर या विषयावर एक मोठे चर्चासत्र महाविद्यालयात आयोजित केले. काळे मराठी आणि संस्कृत मध्ये एम. ए. आणि मराठीचे पीएच.डी. असले तरी त्यांचा आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आहे. चर्चासत्रात त्यांनी दोन निबंध वाचले. पुढे या निबंधांचे पुस्तक काढायचे ठरले. संपादनाची जबाबदारी माझ्याकडे दिली गेली. मी या विषयात नवी असल्यामुळे अडचणी निर्माण होत. मनात शंका असत. त्यांचे निरसन करण्यासाठी मी डॉ. काळे यांना भेटू लागले. कधीकधी डॉ. पुंडे, डॉ. संगोराम आणि मुंबईचे भाषाविज्ञान- तज्ज्ञ डॉ. मिलिंद मालशे हेसुद्धा बैठकीला उपस्थित राहत. अशा सैद्धांतिक चर्चांमधून ज्ञान तर वाढले पण मैत्रीचे धागेही बळकट झाले. पुढे भाषा- विज्ञानाची आणखी दोन पुस्तके मी डॉ. काळे यांच्याबरोबर संपादित केली.

पुणे विद्यापीठात येण्यापूर्वी काळे डेक्कन कॉलेजच्या पश्चिम विभागीय भाषा केंद्रात काम करत. अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याचे काम त्यांच्याकडे होते. या अनुभवामुळे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘अमराठी भाषकांसाठी मराठी’ चा अभ्यासक्रम त्यांनी तीन वर्षे चालवला. त्यांची सहकारी म्हणून मी काम केले. त्यातून Learning Marathi हा ग्रंथ सिद्ध झाला. त्यांचे विषयांवरचे प्रभुत्व आणि शिकवण्याची शिस्त व तळमळ या निमित्ताने मी अनुभवली. ‘भाषांतर’ हा एक महत्त्वाचा विषय. त्याची तात्त्विक आणि उपयोजित मांडणी करणारा 'भाषांतर मीमांसा' हा ग्रंथ त्यांनी परिश्रम घेऊन संपादित केला. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांनी सुरू केलेल्या 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाचे संपादक म्हणून शिस्तबद्ध आणि काटेकोर काम केले.

एम. ए. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कसे तत्पर असत हे आम्ही बघितलेले आहे. आजही माझ्या अनेक शंका- मग त्या भाषाविज्ञान/ व्याकरणातल्या असोत अथवा उत्तर रामचरित्रातील असोत- मी त्यांना फोन करून हक्काने विचारते. त्यांची उत्तरे देण्यासाठी त्यांना पुस्तकाची शोधाशोध करावी लागत नाही. कारण मेंदू नावाच्या कॉम्प्युटरमध्ये त्यांनी हे सारे साठवून ठेवलेले असते. ज्ञानाचा मोठा संचय तिथे झालेला असतो. खऱ्या अर्थाने ते विद्वान आहेत, हे यावरून सिद्ध होते.

डॉ. काळे इतरांना जी मदत करतात ती इतक्या आत्मीयतेने की त्याचे ओझे वाटत नाही. त्यांच्याशी ज्यांचा ज्यांचा परिचय आहे त्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा असणार नाही, याची मला खात्री आहे.

- डॉ. अंजली सोमण

गुरुवर्य डॉ कल्याण काळे: केवलं ज्ञानमूर्ती! केवलं सौजन्य मूर्ती!

आदरणीय गुरुवर्य कल्याण काळे सर म्हणजे केवलं ज्ञानमूर्ती केवलं सौजन्य मूर्ती !  ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या चालीवर म्हणायचे झाले तर तर ‘विद्यार्थ्यांच्या कल्याणा कल्याण काळे सरांच्या विभूती’. सरांचे असंख्य विद्यार्थी कुठेकुठे कार्यरत राहून काळे सरांचा वसा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाला काळे सरांनी मलाच जास्त अंगिकारले आहे असा कळंभाप्रत्यय येतो. या प्रत्ययामध्ये त्यांचे गुरुत्व दडलेले आहे. मराठवाड्यातील परांड्याचे सर खानदेश मार्गे पुण्याला गेले व सरांनी आपल्या सेवेच्या प्रत्येक ठिकाणी आपली नाममुद्रा उमटवली. प्रसिद्धिपराङ्मुख राहून आपले अध्ययन, अध्यापन, संशोधन करत राहिले. विद्या विनयेन शोभते या सुभाषोक्तीचा संपूर्ण अर्थ मला सरांच्या सहवासात उलगडला.
सर माझे एम.फिल. व पीएच.डी. चे मार्गदर्शक. पण त्यांच्या बाजूने कधी मला मित्र म्हणून स्वीकारले ते कळले नाही. मला सर केवळ मार्गदर्शकच वाटले नाहीत तर तत्त्वज्ञही वाटले. सर माझे पुण्यातले पालक झाले. सरांनी मला मार्गदर्शन कसे केले? पालकत्व कसे निभावले? ज्ञानेश्वरीतल्या एका दृष्टांताने माझी भावना प्रकट होईल. 'जैसा स्वभावो मायबापांचा! अपत्य बोले जरी बोबडी वाचा! तरी अधिकची तयाचा| संतोष आथी||

सरांनी संशोधनाच्या निमित्ताने मला जागतिक कीर्तीच्या विद्वानाशी जोडून दिले. ते म्हणजे पद्मश्री डॉ. अशोक केळकर. मी काळे सरांचा विद्यार्थी म्हटल्यावर इतरही मान्यवर विद्वान माझ्याकडे ममतेने पाहतात. सर खरे आचार्य आहेत. आचरणशुद्ध. कोणाही जीवाचा न घडो मत्सर अशा निर्वैर वृत्तीचे. सरांचे हे उपकार मी काय वाणू? सर मला निरंतर जागृत ठेवत असतात. सरांकडून मी अगणित गोष्टी शिकलो. ‘वाऊगे निमित्त बोलो नये’, ‘नामूलं लिख्यते किंचित’, ‘लेखन सुबोध व प्रासादिक असावे’, ‘लेखन अन्वयप्रधान असावे’. इत्यादी इत्यादी. सरांचे घर मला मुक्तद्वार होते. ग्रंथालय खुले होते. आतिथ्यशीलता इतकी की त्यांची प्रमेये जितकी रुचकर तितकी. माझे सौभाग्य पोसले जावे इतक्या रुचकर पदार्थांच्या अनेक पंक्ती मी जेवलो. मी अनेकदा विचार करतो की हे कोणा कारणे झाले असेल? उत्तर मिळते: ‘देवाचे कारण देव जाणे’ या तुकोबांच्या उक्तीद्वारा. यामुळे माझ्या कुंडलीचा मला हेवा वाटतो. सरांनी त्यांच्या नित्य कार्याशिवाय 'भाषा आणि जीवन'चे अनेक वर्षे संपादन केले. राजवाड्यांच्या भाषाशास्त्रविषयक लेखनाच्या खंडाला प्रस्तावना लिहिली. विद्यापीठाने भाषाशास्त्राचा अभ्यासक्रम प्रविष्ट केल्यावर विद्यार्थी व अध्यापक यांची सोय म्हणून त्यांनी पहिले रिडर संपादित केले. अशा विविध नैमित्तिक कामांची नोंद करता येईल. या त्यांच्या विशेषत: भाषाशास्त्र- विषयक कामगिरीची नोंद महाराष्ट्र शासनाने घेऊन सरांना डॉ. अशोक केळकर पुरस्काराने गौरविले. सरांनी तो किती कृतज्ञतेने व कृतार्थतेनी स्वीकारला हे मी साक्षीभावाने पाहिले.

सरांबद्दल किती लिहू असं मला होतंय खरं. पण लेखनसीमा पाळण्याचे बंधन आहे. इतएव एवढेच म्हणतो: ‘हे अपार कैसेनि कवळावे। महातेज कवने धवळावे । गगन मुठी सुवावे। मशके केवी?।।’ सरांच्या मूळसिंचनाने आम्ही अनेक शाखापल्लव संतुष्ट आहोत.

- डॉ. दिलीप धोंडगे

आमचे गुरु

डॉ. कल्याण वासुदेव काळे म्हणजेच काळे सर हे माझे पीएच.डी. चे गाईड. मी त्यांची शेवटची विद्यार्थिनी. मी गमतीने त्यांना, मी तुमचे शेंडेफळ असे म्हणते. माझे भाग्य की, त्याआधी पुणे विद्यापीठात (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 2 वर्षे त्यांच्या हाताखाली भाषाविज्ञान  आणि साहित्यप्रकार (प्राचीन ते आधुनिक साहित्य) असे दोन विषय शिकता आले. सरांची शिकवण्याची तळमळ, विद्यार्थ्यांविषयीचे अपार प्रेम, मराठी तसेच संस्कृत भाषेचा व्यासंग, विद्वत्ता आणि नर्म विनोदबुद्धी यांचा जवळून परिचय झाला. सर जितक्या तन्मयतेने महानुभाव साहित्य, ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय शिकवत, तितक्याच प्रेमाने जी. ए. कुलकर्णींचा ‘पारवा’ शिकवत. भाषाविज्ञान हा तर सरांचा हातखंडा विषय. आम्हा विद्यार्थ्यांना जितकी भीती गणिताची वाटे तितकीच भाषाविज्ञानाची देखील असे. पण सरांनी आमच्या मनातील ही भीती काढून त्याविषयीची प्रीती निर्माण केली. आम्ही प्राध्यापक झाल्यावर सरांचा कित्ता पुढे गिरवला. त्याचा आमच्या विद्यार्थ्यांनाही खूप उपयोग झाला. सरांचा अजून एक विशेष म्हणजे त्यांच्या खाजगी ग्रंथालयात आम्हा विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश होता. सरांनी उत्तम शिकवलेले असे त्यांचे संदर्भग्रंथ वापरून आम्ही उपयुक्त नोंदी करत असू. परिणामी आमच्या बॅच मधील 11 जणांना विशेष योग्यता मिळाली. सरांचे हे ऋण आम्ही सगळेच मान्य करतो. आपल्या विद्यार्थ्याने चर्चासत्रात कोणत्या विषयावर चांगला पेपर वाचला, कोणी उत्तम लिहिला, कोणाचे कशावरचे पुस्तक प्रकाशित झाले, हे सर आवर्जून आणि आनंदाने सांगत असत. सरांनी अनेकांना असे लिहिते केले आहे, बोलते केले आहे. नोकरीला लावले आहे आणि हे सगळे अत्यंत निरपेक्षपणे. सरांचा स्वभाव अतिशय मितभाषी पण ज्याच्याशी त्यांचे सूर जमतात त्यांच्याशी ते छान गप्पा मारतात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी तर कितीही त्रास सहन करायला तयार होतात. (याचा अनुभव मला पीएच.डी.च्या वेळी आला.) गाईडच्या विक्षिप्तपणाचे, लहरीपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध असताना मला मात्र अत्यंत तळमळीने, नेमकेपणाने आणि वेळेत प्रबंध सादर करण्याची संधी मिळाली, ते माझे गुरुबळ अनुकूल होते म्हणूनच. आजही एखादी साहित्याविषयी किंवा भाषा, लेखनाविषयी शंका सरांना विचारली तर अत्यंत आत्मीयतेने आणि समाधान होईपर्यंत ते त्याचे निरसन करत राहतात. सरांची विद्यार्थिनी असे सांगितले की आजही आमच्याकडे बघण्याची नजर आदराची होते. आम्हालाही त्यांचे विद्यार्थी आहोत हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो. आमच्या गुरूंना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

- डॉ. वैखरी वैद्य

 

श्रेष्ठ मार्गदर्शक काळेसर

माझी आणि डॉ.काळे  यांची ओळख तशी नंतरची. मी पश्चिम विभागीय भाषा केंद्र प्राध्यापक म्हणून लागले तीच मुळी सरांच्या जागी. सर विद्यापीठात प्रपाठक म्हणून रुजू झाले आणि केंद्रात त्यांची रिकामी झालेली जागा मला मिळाली. पण फारशी ओळख नसतानाही नंतरच्या काळात ते सतत माझी पाठराखण करत राहिले. नोकरीत मनाविरुद्ध काही घडलं की मी सरांकडे जाऊन साचलेलं मन मोकळं करायची. सर माझी समजूत काढताना म्हणायचे "नोकरीच्या ठिकाणी पाऊल टाकल्याक्षणी घरचा कोट काढून ठेवायचा, तिथला कोट घालून वावरायचं. तिथून निघताना तो कोट काढून खुर्चीवर टाकायचा आणि आपला कोट घालून घरी जायचं". सरांच्या शिकवणीत प्रत्येक नोकरदारांनी स्वीकारावं असं शहाणपण होतं.
त्यांच्याच प्रेरणेने मी विद्यापीठात, चर्चासत्रात वाचण्यासाठी पहिला शोधनिबंध लिहिला. तेही प्रत्येक टप्प्यावर सरांना विचारत विचारत. पण इतकं करून मला चर्चासत्राला जाता आलं नाही, तर त्यांनीच तो वाचूनही दाखवला. विद्यापीठात केवढा नावलौकिक असलेल्या एवढ्या अनुभवी प्रवर्तकांनी माझ्यासारख्या नवशिक्या प्राध्यापिकेचा निबंध वाचून दाखवावा ही शिक्षणक्षेत्रातील अपूर्वाईची घटना तर होती पण माझ्यासाठी तो आयुष्यभरासाठी ऋणात बांधून ठेवणारा क्षण होता. मी पीएच.डी.च्या मार्गदर्शनासाठी सरांकडे गेले होते. परंतु त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते प्रत्यक्षात घडू शकलं नाही. सरांच्या वर्गात बसून शिकायची माझी इच्छा अपूर्ण राहिली असली तरी, नंतरच्या काळातही सरांचे मार्गदर्शन मला सतत मिळत राहिलं. अगदी माझ्याकडे प्राचार्य पदाची जबाबदारी आल्यानंतरही. मी सरांना फोन करायचा आणि शंका निरसन करून घ्यायचं हे ठरलेलंच होतं.

अजूनही सरांबरोबरच्या अर्ध्या तासाच्या गप्पांमधूनही खूप काही शिकायला मिळतं. आपल्या जाणिवांच्या कक्षा विस्तारतात. समृद्ध होतात. या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला माझं मनापासून वंदन. त्यांच्या पुढच्या निरामय आणि शांतीपूर्ण जीवनासाठी, पुढील साहित्यसेवेसाठी उदंड शुभेच्छा! सर, तुम्ही आम्हाला शंभर वर्षे हवे आहात.

- डॉ. कलिका मेहता

भाषाविज्ञानाचे आणि संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक डॉ. कल्याण काळे

डॉ. कल्याण काळे म्हणजे मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्ती. विद्यापीठीय शिक्षणक्षेत्रातील थोर व्यासंगी. त्यांना पाहताच एखाद्या संताचा भास व्हावा असे सात्त्विक व्यक्ती. त्यांचे वागणे- बोलणे अगदी तसेच. त्यांचे सान्निध्य मला लाभले ते पुणे विद्यापीठात एम.ए. (मराठी) करत असताना. त्यावेळी एम.ए.च्या प्रथम वर्षाला ते भाषाविज्ञान शिकवायला होते. भाषाविज्ञानात पहिल्या सत्राला वर्णनात्मक भाषाविज्ञान आणि दुसऱ्या सत्रात ऐतिहासिक भाषाविज्ञान. दोन्ही सत्रात सरांनी भाषाविज्ञान ज्या प्रकारे शिकवले त्याला तोड नाही. भाषाविज्ञानाचा एवढा उत्तम शिक्षक माझ्या तरी पाहण्यात कधी आला नाही. हवेने सहज वहन करावे त्याप्रमाणे काळे सरांच्या शिकवण्यात एक प्रकारची सहजता होती. त्यांचे शिकवणे सुबोध शैलीतील. क्लिष्ट विषय ते सहजतेने शिकवत. त्यामुळे त्यांचा विषय कधीही कठीण वाटत नसे. त्यांच्या शिकवण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही विषयाचा समग्र अभ्यास करूनच तो ते मांडत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाच्या विविध बाजूंचे एकाच वेळी दर्शन घडत असे.
वस्तुनिष्ठ संशोधनाची मांडणी हे त्यांच्या अध्यापनाचे आणखी एक वैशिष्ट्य. बदल स्वीकारण्याबाबत ते लवचिक असत. एकदा मी विचारले, सर तज्ज्ञ हा शब्द बहुतांशी तज्ञ असा लिहिला जातो तर ते आता प्रमाणलेखनात बरोबर मानायला काय हरकत आहे? त्याविषयी ते म्हणाले होते की, बरोबर आहे. भाषा परिवर्तनशील असते. आता असे शब्द बरोबर म्हणून मान्य करायला हरकत नाही. संस्कृतचा उत्तम दांडगा अभ्यास काळे सरांचा होता. पण ते भाषेविषयी मात्र पारंपरिक मताचे नव्हते. भाषा कधीही शुद्ध किंवा अशुद्ध नसते, असेच ते म्हणत. मराठीचे लेखन मराठीच्या प्रकृतीप्रमाणे करायला हवे, हा विचार त्यांनी कधीच स्वीकारला होता. मराठीच्या शुद्धलेखनासाठी ते मराठी लेखनसंकेत असा शब्दप्रयोग करत. काळे सर नेहमी संशोधनाने पुढे आलेल्या मतांचा आदर करत. एखादे मत संशोधनातून पुढे आले, ते मान्य झाले तर अभ्यासात प्राध्यापकांनी ते स्वीकारले पाहिजे व ते विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे या मताचे ते होते. ‘विवेकसिंधू’ हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत मराठीच्या पुस्तकांमधून वाचायला मिळत असे. त्याविषयी ते नेहमी सांगत की, शं. गो. तुळपुळे यांनी आता सिद्ध केले आहे की, विवेकसिंधू हा ग्रंथ चौदाव्या शतकातील आहे. त्यामुळे आता त्याला आद्य ग्रंथ मानता येणार नाही. संशोधनातून एखादे मत मांडले गेले की त्याचा लगेच स्वीकार करणारे ते प्राध्यापक होते.
काळे सरांचा महाभारत, संत साहित्य, भाषाविज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी भाषाविज्ञानात संपादित केलेली पुस्तके विद्यापीठीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी व्यावहारिक मराठीवरही पुस्तक सिद्ध केले. त्या काळात तर या विषयावर फारशी पुस्तके पण नव्हती. सरांनी एम. ए. भाग दोनला आम्हाला ‘नेमलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास’ हा विषय शिकवला. प्राचीन साहित्याच्या इतिहासाविषयी ज्या ज्या वेळी चर्चा निघत असे, त्यांना विवेचन करण्याचा प्रसंग येई, त्या त्या वेळी ते आपल्याकडे इतिहासलेखनाची दृष्टी नव्हती, त्यामुळे ऐतिहासिक वस्तुनिष्ठ नोंदी आढळत नाहीत, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत. सरांचे प्रचंड वाचन असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना एखादी शंका विचारायला गेले की ते त्याविषयी विस्तृत माहिती देत. वर्गामध्ये शिकवताना ते काही प्रश्न विचारत. अनेकवेळा त्यांच्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यामुळे मी त्यांचा आवडता विद्यार्थी बनलो होतो. पण त्यामुळे त्यांनी कधी इतर विद्यार्थ्यांना अंतर दिले नाही. शिक्षकाने निःपक्षपाती असावे. तटस्थ वृत्तीने विषयाचे सर्वांगीण दर्शन घडवावे, या मताचे ते होते. नेमलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास हा विषय शिकवताना पारवा हे जी.एं.चे पुस्तक त्यांना शिकवले.. त्यावेळी जी.एं.विषयी अनेक गैरसमज साहित्यविश्वात पसरलेले होते. आम्हा विद्यार्थ्यांना मात्र ते जी.एं.चे मोठेपण, त्यांची बलस्थाने सांगत. त्यांच्यावरील आक्षेपांचा कसा विचार करायचा याविषयी त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. एखाद्या लेखकाची जीवनदृष्टी त्या लेखकाचा अभ्यास करत असताना शिक्षकाने सांगितली पाहिजे. त्याशिवाय त्याच्या साहित्याचे आकलन करता येत नाही, असे त्यांचे मत होते.
काळे सर गुणवत्तेची कदर करणारे होते. त्यावेळच्या मराठी साहित्यक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या अभ्यासकांविषयी ते नेहमी गौरवोद्गार काढत. पुणे विद्यापीठात मराठी विभागात प्राध्यापक पदासाठी मुलाखती होत्या. त्यावेळी विदर्भातून डॉ. स. त्र्यं. कुल्ली यांचा अर्ज होता. मुलाखतीनंतर स.त्र्यं. कुल्ली यांची निवड झाली नाही, त्यावेळी त्यांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यांच्या मते, एक उत्तम अभ्यासू प्राध्यापक, चांगला समीक्षक म्हणून स. त्र्यं. कुल्ली यांची निवड व्हायला हवी होती. कुल्ली यांचे त्यादरम्यान ‘जीए ∶ जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी’ हे पुस्तक गाजत होते. अभ्यासू व्यक्तींचा आदर राखण्याची वृत्ती ही संतप्रवृत्तीच्या व्यक्तींत अधिक आढळते. काळे सर हे अशांपैकीच एक होते. शिस्त, नीटनेटकेपणा, साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, शांत आणि संयत शैली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसे. उठता बसता आपल्या अभ्यासाच्या विषयाचं चिंतन करावं, असं ते आवर्जून सांगत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच झाला. डॉ. वि. भि. कोलते यांच्या प्रचंड संशोधनकार्याचा ते अनेकदा आदरपूर्वक उल्लेख करत. त्यांच्या अध्यापनात अभ्यास-व्यासंगातील कष्टाचे प्रतिबिंब पडत असे. भाषाविज्ञान शिकवताना विविध भाषांतील उदाहरणांनी तो विषय ते फुलवत. अशा अनेक गोष्टींमुळे काळे सरांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असे.

- डॉ. प्रणव रमाकांत कोलते, अमरावती