पुंडे सरांविषयी मनोगत

माझे मित्र डॉ. द. दि. पुंडे
डॉ. द. दि. पुंडे यांची माझी पहिली भेट होऊन आता चाळीस एक वर्षे होत आहेत. मी त्यांना त्यांच्या मॉडर्न महाविद्यालयात जाऊन भेटलो होतो. निमित्तही काहीसे चमत्कारिक होते. चमत्कारिक असे की त्यावेळी मी 'प्रतिष्ठान'चा कार्यकारी संपादक होतो आणि त्यात एका मान्यवर समीक्षकाचा लेख छापला होता. कुसुमाग्रजांवर. लेख चांगला होता पण पुढे कुणी तरी माझ्या असे लक्षात आणून दिले की तो लेख म्हणजे डॉ. द. दि. पुंडे यांच्या अप्रकाशित प्रबंधातील एक प्रकरण होते. प्रबंध पुणे विद्यापीठात सादर झालेला होता व अप्रकाशित होता. त्यामुळे तो माझ्या पाहण्यात येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एक वाङ्मयीन अपराध घडला होता. मग मी कुठल्यातरी निमित्ताने मुंबईस गेलो होतो, तेव्हा मुद्दाम पुण्यात आलो. डॉ. पुंडे यांना भेटायला. त्यांच्याविषयी ऐकून होतो. विशेषत: त्यांनी आणि डॉ. यशवंत सुमंत यांनी घेतलेल्या चर्चासत्रासंबंधी. हे चर्चासत्र त्यांना जातीव्यवस्थेवर घेतले होते आणि महाराष्ट्रातील हे या विषयावरील पहिले चर्चासत्र होते. त्यांची भेट झाली. त्यांना आनंद झाला. लेखावरील अाक्षेप व वस्तुस्थिती सांगणारा खुलासा देण्याचे त्यांनी मान्य केले. त्याच भेटीत मी त्यांना सांगितले की असे प्रकार खूप होताहेत. तेव्हा प्रबंधाला पुस्तकरूप लवकर द्या. तसे त्यांनी केले व संपूर्ण प्रबंध दुसऱ्याच्या नावावर जाण्यापासून वाचला!

या प्रसंगापासून आमची जी मैत्री झाली ती आजतागायत वृद्धिंगत होत गेली. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या निमित्ताने प्रा. गो. म. कुलकर्णी आणि ते औरंगाबादला येत असत. गो. म. कुलकर्णी आणि डॉ. द. दि. पुंडे हे एक अद्वैत आहे, असे माझ्या लक्षात आले. या दोघांबरोबर गप्पा मारणे हा एक आनंदाचा क्षण असायचा. विशेषत: वाङ्मयेतिहासाची तात्त्विक चर्चा तर हे दोघेही करत असतच, मराठी वाङ्मयेतिहासातील सुटलेले दुवे कोणते, यावरही चर्चा होत असे. पुढे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तेथे डॉ. द. दि. पुंडे सहयोगी प्राध्यापक म्हणून शिकवायला येत असत. त्यानिमित्ताने गाठीभेटी वाढल्या. त्यांची मला अनेक प्रकारे मदतही झाली. पुढे मराठी विभागाच्या वतीने 'मराठी वाङ्मयेतिहासाच्या पुनर्लेखनाच्या दिशा' या विषयावर चर्चासत्र झाले. त्याच्या नियोजनामध्ये त्यांचे मोठेच सहकार्य विभागाला मिळाले. या चर्चासत्रातून पुष्कळ काही निष्पन्न झाले, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

विद्यापीठात सत्र आणि श्रेयांक पद्धती सुरू झाली. त्यामुळे अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली गेली. त्यात एक नवी अभ्यासपत्रिका सुरू करण्यात आली "वाङ्मयेतिहासलेखनविद्या." अशा प्रकारचा अभ्यासक्रम जाधवपूर विद्यापीठ सोडता कोठे नव्हता. तो सा. फु. पुणे विद्यापीठात सुरू झाला तोही अगदी डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने.

माझ्या सा. फु. पुणे विद्यापीठातील काळात आमच्या विविध निमित्ताने भेटीगाठी होत. विविध समित्यांवर आम्ही एकत्र काम केले. त्यावेळी माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. वाङ्मयेतिहास, भाषाविज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय असले तरी सर्व प्रकारच्या नव्या प्रवाहांचे आणि विचारांचे स्वागत करणारे हे व्यक्तिमत्व आहे. अगदी अलीकडे गावगाड्याचे त्यांनी केलेले संपादन याची साक्ष आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांविषयी कमालीची आस्था आहे. त्यांचा अभ्यास आणि संशोधनासंबंधीच आस्था आहे असे नाही तर विद्यार्थ्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. सहवासात आलेल्या माणसाबद्दलची आस्था हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव असल्याचे मी अनुभवले आहे. प्रा. गो. म. कुलकर्णी यांच्या आजारपणात त्यांनी केलेले सहाय्य केवळ अविस्मरणीय आहे. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांनी गो. मं. च्या पत्नीला सर्वतोपरी मदत केली. यासंबंधीचे तपशील सांगणे हे डॉ. द. दि. पुंडे यांना आवडणार नाही, याची मला कल्पना आहे.

वाङ्मयाचा एक चिकित्सक अभ्यासक माणसांसंबंधी केवढी आस्था बाळगतो, हे पहावयाचे असेल तर त्याने डॉ. द. दि. पुंडे यांच्याकडे पहावे.

- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

भाग्याने मिळावा असा मित्र
डॉ. पुंडे यांचा आणि माझा परिचय झाला त्याला आता 35 पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली. तेव्हा ते पी.एच.डी. करत होते. त्या काळात 'मराठी प्राध्यापक संघटना ' खूप जोमाने काम करायची. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. गं. ना. जोगळेकर प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष होते. प्रत्येक प्राध्यापकाने आपल्या पीएच.डी. विषयाचा परिचय करून द्यायचा, अशी एक व्याख्यानमाला त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात आयोजित केली होती. इथे मी पुंडे यांना प्रथम पाहिले. फिकट जांभळ्या रंगाचा रुबाबदार शर्ट त्यांनी घातला होता. डोक्यावर दाट, नेटका भांग पाडलेले केस होते. प्रबंधविषयाची माहिती मिळवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांविषयी ते मनापासून बोलत होते. बोलता-बोलता डोळ्यांवरचा चष्मा उजव्या हाताच्या उलट्या तळव्याने मागे सारायची त्यांना सवय होती. ती सवय आजही कायम आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरी तसेच दाट आहेत. पीएच.डी. साठी जेवढे परिश्रम घेतले तेवढेच परिश्रम ते हाती घेतलेल्या प्रत्येक कामासाठी करतात, हे परिचयानंतर लक्षात गेले.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने माझे एक व्याख्यान आयोजित केले होते. ते ऐकण्यासाठी पुंडे आले होते. व्याख्यान झाल्यानंतर ते मला म्हणाले "छान बोललात." मोठ्या शब्दात अभिप्राय द्यायची त्यांची सवय आहे. हे अभिप्राय नेमके, सकारात्मक आणि समोरच्या व्यक्तीला खूष करणारे असतात. एखाद्या घटनेवर, व्यक्तीवर किंवा वाङ्मयीन प्रश्नावर टीका करायची असेल तर मात्र पुंडे स्पष्ट, परखड आणि प्रसंगी घणाघाती सुद्धा बोलतात. त्यांची अशी काही व्याख्याने मी ऐकलेली आहेत.

1981 साली श्री. ना. दा. ठा. कला महाविद्यालयात मला प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि 'वर्णनात्मक भाषाविज्ञान' हा विषय शिकवायला दिला. या विषयावर संपादित पुस्तक तयार करताना डॉ. पुंडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. श्री. दा. संगोराम यांच्याबरोबर माझा घनिष्ठ परिचय झाला. पुस्तकाच्या निमित्ताने ज्या चर्चा झाल्या, त्या मनाला इतक्या भिडल्या की आम्ही चौघांनी 'चौरस' या नावाचे एक मंडळ सुरू केले. दर महिन्यात आम्ही भेटायचो. वाचलेल्या नव्या पुस्तकांवर चर्चा करायचो. लेख किंवा सेमिनारमध्ये सादर करायचा निबंध आम्ही आधी चौरस मंडळात वाचायचो. त्यावर साधक बाधक, कठोर टीका व्हायची. टीकेच्या अशा तेजाबाने प्रसिद्ध होण्यापूर्वी लेख झळाळून निघायचा. माझे जीवनविषयक आकलन आणि समीक्षादृष्टी आणखी समृद्ध होण्यामध्ये चौरस मंडळ आणि डॉ. पुंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

'शिरवाडकर आणि कुसुमाग्रज' हा पुंडे यांचा प्रबंधविषय. पण त्यांच्या प्रज्ञेला ' अविषय' असा काही नाहीच. वाङ्मयेतिहासाची नवी सैद्धांतिक मांडणी करून त्यावर आणि अनेक लेखक-कवींवर त्यांनी ग्रंथ संपादित केले आहेत. भाषेतील गमतीजमती शोधून ' भयंकर सुंदर मराठी' आणि' आणि 'गंमत शब्दांची' अशी हलकीफुलकी पुस्तके लिहिली. सुमारे 25 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल., पीएच. डी. केले. त्यांच्या अभ्यासविषयक अडचणी तर त्यांनी सोडवल्याच, शिवाय वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्नही सोडवले. इतरांकडे संशोधन करणाऱ्यांनाही त्यांनी सहकार्य केले. कारण मदत करणे हीच त्यांची वृत्ती आहे. प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले.

दोन गोष्टी मात्र राहून गेल्या. अनेक व्यक्ती पुंडे त्यांच्या अंतरंग बहिरंगासह गप्पांतून उभ्या करतात. सचिवालयातील व प्राध्यापकाच्या नोकरीतील विविध किस्से ते रंगवून सांगतात. भरगच्च करिअर करताना स्वतःमधील ललित लेखक आणि आणि 'स्टोरी टेलर' कथाकार या दोन रूपांची मात्र त्यांनी हेळसांड केली. त्यांना उजाळा दिला नाही.

पुंडे यांच्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागते. माझ्यापाशी ते भाग्य आहे!

- डॉ. अंजली सोमण

डॉ. द.दि.पुंडे सर
पुंडे सरांना `सर' म्हणावं अशा प्रकारे मी किंवा विरूपाक्ष कधीच त्यांच्या हाताखाली शिकलो नाही, कधी त्यांच्या वर्गात बसून त्यांची व्याख्यानं ऐकली नाहीत. तरीही, सर आम्हाला दादा आणि उमाताई म्हणत असले तरी, आमच्या दृष्टीनं ते आमचे सरच आहेत. त्यांनी आमचं गुरूत्व स्वीकारलं नसलं तरी वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत राहिल्यामुळे ते आमचे आपोआप सर झाले आहेत.

८२ सालची गोष्ट . मी तेव्हा एस.एन.डी. टी.मध्ये 'आर्ट अँड पेंटिंग ' हा विषय घेऊन एम.ए. करत होते. दुसरं वर्ष चालू होतं. त्या वेळी माझा पहिला अनुवाद प्रकाशित झाला होता. नवोदित प्रकाशकानं उत्साहानं पुस्तक समारंभपूर्वक प्रकाशित केलं होतं. पण त्या पुस्तक-निर्मितीमध्ये असंख्य चुका राहिल्या होत्या. त्यामुळे, नाही म्हटलं तरी, मन खट्टू होतं.

अशा वेळी माझी वर्ग-मैत्रिण सौ. शकुंतला पुंडे हिच्याकडून तिचे पती पुंडे सरांविषयी समजलं. त्या वेळी ते अध्यापनाबरोबरच विविध प्रकाशकांकडे संपादकीय विभागात `निमंत्रित' म्हणून काम करायचे. त्यानंतर आमचा या जोडप्याबरोबरचा स्नेह सुरू झाला. अर्थातच त्यात आदरही पुरेपूर होताच. आम्ही चौघांनी बरेच एकत्रित प्रवासही केले.

त्या सुमारास मी शिवराम कारंतांची `डोंगराएवढा' आणि भैरप्पांची `वंशवृक्ष' अनुवादित करत होते. त्या निमित्तानं या दोघांशीही भरपूर बोलणं होत होतं. विशेषत: `डोंगराएवढा' विषयी ऐकल्यावर त्यांनी मला गो. नी. दांडेकरांच्या अनेक छोट्या छोट्या कादंबऱ्या वाचायला दिल्या. कोकणाचा फिल यावा म्हणून चौघंही शकुंतलेच्या माहेरी, करंबवण्याला जाऊन आलो. माझं हस्तलिखित तयार झाल्यावर या दोघांनीही ते बारकाईनं वाचून मराठीच्या अंगानं असंख्य सूचना केल्या. वाक्यं सुटसुटीत कशी ठेवायची, लेखन सुवाच्य कसं हवं, कसं दोन्ही बाजूला व्यवस्थित मार्जिन सुटलं पाहिजे यासारख्या, लेखनातल्या प्राथमिक, बारीक-सारीक गोष्टी सांगितल्या. त्या वेळी माझ्या लेखनात काही शुद्धलेखनाच्या चुकाही असायच्या, त्याही या दोघांनी दाखवून दिल्या. अनुवादात नेहमी विचित्र वाक्यरचना आढळत असते; त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळाला तरी संपूर्ण वाक्याचा अर्थ लागत नाही, (बहुतेक वेळा अभावितपणे मूळ भाषेचं व्याकरण वापरल्यामुळे हे घडतं.) अशी वाक्यं पाहाताना मी शरमिंदी होऊन जायची, नंतर सगळेच भरपूर हसायचो.

माझ्या अनुवादक म्हणून करियरच्या अगदी सुरुवातीच्याच टप्प्यावर हे घडत होतं. पुंडे सरांचे एक जवळचे स्नेही कै. डॉ. सुधाकर देशपांडे यांनी आमच्या पहिल्याच अनुवादावर, `तनमनाच्या भोवऱ्यात' या कादंबरीवर  मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या श्री. दावतर यांच्या केवळ समीक्षेला वाहिलेल्या `आलोचना' या त्रैमासिकात सुदीर्घ समीक्षा लिहिली. (नंतर त्यांनी कारंतांच्या सर्वच अनुवादित कादंबऱ्यांवर लिहिलं, त्याचं कन्नडमध्ये पुस्तकही निघालं.) या समीक्षा-लेखनामुळे `अनुवाद हे गंभीर प्रकरण आहे, आमच्या एखाद्या चुकीमुळे मराठी समीक्षक कारंतांसारख्या लेखकावर ताशेरे ओढू शकतो,' याचं भान कळत-नकळत आलं. (याच कादंबरीवर ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर पाध्ये यांनीही लिहिलं होतं.)

`केतकर वहिनी' ही माझी एक स्वतंत्र कलाकृती. चरित्रात्मक कादंबरी म्हणता येईल. सरांच्या या नातेवाईक. लेखन झाल्यावर ते बाड पुंडे सरांकडे दिलं. त्यांनी आणि शकुंतला पुंडेंनी ते वाचून त्यांना जे जाणवलं होतं, त्याप्रमाणे प्रतिकूल अभिप्राय दिला. सहाजिकच मी त्या वेळी अतिशय खट्टू झाले. सगळं बाड बाजूला सारलं आणि हातात असलेल्या दुसऱ्या अनुवादाच्या कामात गढून गेले. डोकं शांत झाल्यावर त्यांनी दिलेल्या अभिप्रायावर पुन्हा विचार केला. त्या सूचना पटण्यासारख्या होत्या. त्याप्रमाणे लेखनाच्या आवश्यकतेनुसार काही प्रसंग वाढवले आणि अखेर ती कृती तयार झाली.

पुंडे सरांनी विरूपाक्षांनाही मराठीत लिहितं केलं. `भाषा आणि जीवन' या त्रैमासिकासाठी त्यांनी `मराठी शिकताना - एका कन्नडिगाचे अनुभव' असं टिपण लिहून घेतलं. सांगलीच्या कै. म. द. हातकणंगलेकरांनी जी.ए.कुलकर्णींच्या भाषेवर लिहिताना या लेखातल्या काही मुद्यांचा संदर्भ घेतला होता. नंतरही विरूपाक्षांचे काही लेख प्रकाशित झाले. त्यातला महत्त्वाचा म्हणजे `अनुवाद आणि समीक्षा'. असे लेख लिहिताना, तसेच सरांबरोबरच्या साध्या गप्पांनंतरही आम्हाला आमचे काम करायला भरपूर उत्साह येत असे.

सरांमुळे त्यांचा विद्यार्थीवर्गही माझ्या संपर्कात आला आणि सरांबरोबरच त्यांच्याशीही बोलता-बोलता साहित्यिक जाण पक्व व्हायला मदत झाली. तसंच कारंत-भैरप्पांसारखे महत्त्त्वाचे कन्नड लेखक पुण्यात आले की ती भेट जास्तीत जास्त अर्थपूर्ण कशी होईल, यासाठी महत्त्वाचं मार्गदर्शन करायचं कामही त्यांचंच! त्या वेळी पुण्यातले बहुतेक सर्व वृत्तपत्रातले वार्ताहर त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे ते सहज शक्यही होत होतं.

सरांनी अगदी सुरुवातीपासूनच आमच्या अनुवाद-कार्याविषयी आस्था दाखवली. हा त्यांच्या स्वभावाचाच भाग होता. तसेच, तेव्हा त्यांच्या प्रज्ञेतला `वाङ्मयेतिहासाची संकल्पना' हा विषय ज्वलंत होता. त्यामुळे त्यांना कदाचित या कार्याचं महत्त्व वाटलं असावं. ते काही काळ `मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्रा’चे विश्वस्त होते. त्यामुळेही सतत संपर्क राहिला.

आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे, आपल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं त्यांनी पुणे विद्यापीठात भैरप्पांच्या अनुवादित कादंबऱ्यांवर तीन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आस्था दाखवली. विद्यापीठात तेव्हा कार्यरत असणाऱ्या डॉ. विद्यागौरी टिळक आणि डॉ. मृणालिनी शहा या सरांच्या दोन विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आणि चर्चासत्र यशस्वी होईल असं पाहिलं. त्यात वाचल्या गेलेल्या निबंधांचं पुस्तकही या दोघींच्या संपादनाखाली प्रकाशित झालं.

सरांशी सहज बोलता-बोलता आम्हाला कितीतरी बारीक-सारीक गोष्टी समजत गेल्या आणि साहित्य-क्षेत्रातली आमची वाटचाल सुकर होत गेली. गुरू म्हणून त्यांच्याकडून जे काही मिळालं त्यातले हे काही अगदीच मोजके काहीतरी....

- डॉ. उमा वि.कुलकर्णी

ज्ञानाचा वारसा देणारे आमचे गुरू पुंडेसर
एकवीस वर्षे झाली माझा आणि सरांचा ऋणानुबंध आहे. माझं एम.फिल. आणि पीएच.डी. दोन्हीही पुंडेसरांकडे झालं आहे. मी 1998 मधे पुंडेसरांना प्रथम एम.फिल. साठी भेटले होते. तेव्हापासून जे नातं जोडलं गेलं ते अधिकाधिक दृढ होत गेलं. आता मी त्यांची मानसकन्या म्हणून आमच्या विद्यार्थिपरिवारात परिचित आहे. खरं तर मी सरांचं शेंडेफळ-म्हणजे त्यांची पीएच.डी.ची शेवटची विद्यार्थिनी. सरांचा सहवास आजही मला नित्य लाभत असतो. त्यांच्याबरोबर काम करताना, काही घरगुती कामं करताना सरांची काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, त्यांचं तर्कशास्त्रानुसार कोणत्याही विषयाचा सांगोपांग विचार करणं, अभ्यास करणं हे सारं मला पाहायला, अनुभवायला मिळालं, आजही मिळतं आहे. म्हणूनच मी अतिशय भाग्यवान आहे की, सरांच्या सहवासामुळे मी घडत गेले. त्यांची अभ्यासाची, विचारांची शिस्त माझ्या अंगवळणी पडत गेली. मला आठवतंय, मी एम.फिल. करत असताना सर मला बडोदा, हैदराबाद, मुंबई याठिकाणी तिथली ग्रंथालयं पाहायला घेऊन गेले होते. ग्रंथालयात पुस्तकं शोधणं, अचूक संदर्भ शोधणं आणि कोणतंही संदर्भाचं पुस्तक मिळाल्यावर आपल्याला आवश्यक तो संदर्भ कमी कष्टात शोधणं हे सारं मला सरांच्या अभ्यास-संशोधनपद्धतीमुळं आत्मसात करता आलं. ग्रंथालयातून पाहिजे ते पुस्तक मिळवून आवश्यक तो संदर्भ मिळवून त्याची सुव्यवस्थितपणे नोंद करून ठेवणे ही पद्धत सरांमुळे माझ्यात अगदी रुजून गेली आहे. तसंच निर्देश सूचीमधे मला पुंडेसरांनीच तरबेज केलं आहे. सोबत बसवून मला त्यांनी निर्देश सूची कशी करायची हे शिकवलं आहे. कोणत्याही विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची संशोधनपद्धती त्यांनी माझ्यातही रुजवली आहे. आतापर्यंत मी जे काही संशोधनपरलेखन केलं आहे ते केवळ न केवळ पुंडेसरांच्या या मार्गदर्शनामुळेच शक्य झालं आहे.

वडलांसारखं-खरं तर आईसारखं म्हणायला हवं-प्रेम सरांनी दिलं आहे. हा केवळ माझाच अनुभव आहे असं नाही, त्यांच्या प्रत्येक विद्यार्थिनीचा हा अनुभव आहे. कोणाच्याही अडचणीच्या वेळी उभे राहणारे पुंडेसर आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ आहेत. आईतलं पुरेपूर वात्सल्य सरांमधे आहे. अतिशय ऋजू स्वभाव, मितभाषी. परंतु संशोधन, वाङ्मयेतिहास हे त्यांचे विषय निघाले की, सरांचं बोलणं कधी संपूच नये असं वाटत राहातं. कुसुमाग्रज हा सरांचा पीएच.डी.चा विषय. त्यावर अजूनही इतके भारावून, प्रेमानं बोलत असतात की, वाटतं असं आपल्याला जमलं पाहिजे. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं ते माझ्या अंतर्मनात अगदी घट्ट रुजून बसलं आहे, ते असं की, आपल्या विषयावर, अभ्यासावर आपलं प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, म्हणजे तो विषयदेखील तुमच्यावर प्रसन्न होतो. हे त्यांनी आपल्या वाङ्मयेतिहास या विषयावरील अभ्यासाने आणि अभ्यासग्रंथांनी सिद्ध केलं आहे. त्यांच्यासारखी अभ्यासावर असलेली निष्ठा पाहून त्यांच्याविषयी अतोनात अभिमान वाटतो, आदर वाटतो.

सरांसारखे गुरू मिळायला खरोखर पूर्वसंचित लागतं ते आम्हा सगळ्या विद्यार्थिनींचं आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार करणारे, त्यांच्या अडीअडचणीत आर्थिक, भावनिक मदत करणारे, त्यांना अभ्यासप्रवृत्त करणारे गुरू अतिशय दुर्मीळ असतात. त्यातलेच आमचे पुंडेसर आहेत हे मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो आहे. सरांमधली ज्ञानाची ऊर्जा वंदनीय आहे, ती मला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- डॉ. अंजली जोशी, पुणे

ऋषितुल्य गुरू, साक्षेपी संशोधक: डॉ. द. दि. पुंडे
पुंडेसरांना प्रथम बघितल्याचा, भेटल्याचा दिवस अजूनही लक्षात आहे. 1982-83 मधे मी एम.फिल. करत होते. पुंडेसरांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मराठी विभागाने आमच्या वर्गात सरांचा सत्कार केला होता. सरांचा मितभाषी स्वभाव, ऋजू बोलणे, एकंदरच सौम्य व्यक्तिमत्त्व पाहून ते बरेचसे अंतर्मुख असावेत असं वाटून गेलं होतं. काही वर्षांनी अनपेक्षितपणे पुंडेसरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. सुरुवात एम.फिल. प्रबंधिकेच्या कामाने झाली. केवळ एम.फिल, पीएच.डी. पुरतेच नाही तर कायमच्यासाठी आमच्यात गुरुशिष्य नाते निर्माण झाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुरू म्हणून, संशोधक म्हणून, अभ्यासक म्हणून अनेक पैलू अनुभवाला आले. विद्यार्थ्याला आवश्यक तिथे प्रोत्साहन, प्रशंसा, सुयोग्य मार्गदर्शन, संशोधनाच्या कामातील शिस्त, नेमकेपणाविषयी आग्रह, काटेकोरपणा, विद्यार्थ्याची गुणवत्ता ओळखून त्याला मदत करण्याची तत्परता इत्यादी वैशिष्ट्यांमुळे गुरू म्हणून पुंडेसर एक चालतेबोलते विद्यापीठच होत.

प्रकृतीच्या तसेच काही अन्य अडचणींमुळे माझे एम.फिल.च्या प्रबंधिकेचे काम मी लेखन करूनही मधेच थांबले होते. मी खूप अस्वस्थ होते. नाटककार जयवंत दळवी: ‘सभ्य गृहस्थ हो!’ ते ‘पुरुष’ या विषयावर मी केलेले लेखन घेऊन मी पुंडेसरांना भेटले. सरांनी काही नाटकांवरील लेखन वाचून दाखवायला सांगितले. “बॅरिस्टर”, “संध्याछाया”, “महासागर” या नाटकांवरचे लेखन मी वाचून दाखवल्यावर सरांनी मला थांबवले. माझे अभिनंदन करीत म्हणाले, “अप्रतिम, अप्रतिम लेखन केले आहे तुम्ही. तुम्हालाच माहीत नाही तुम्ही किती उत्तम लेखन करता ते. आत्तापर्यंत तुमच्या हातून कितीतरी समीक्षालेखन व्हायला हवे होते. पण आता थांबू नका. हे काम जपून ठेवा. पीएच.डी.साठी मी मार्गदर्शन करीन.” सरांच्या प्रोत्साहनपर, दिलासा देणा-या बोलण्याने मी पुन्हा एकदा लेखन, संशोधनाकडे वळले ते कायमच्यासाठीच. एम.फिल प्रबंधिकेला ‘ए’ ग्रेड मिळाली. पाठोपाठ “दळवींची नाटके : एक अंतर्वेध” हे माझे पुस्तकही सरांच्या सहकार्यामुळेच प्रसिद्ध झाले. कोणत्याही नवीन कामाची तयारी केली की सरांना भेटायचे, बोलायचे. त्यांनी ‘उत्तम, काम चालू करा.’ म्हटले की काम करायला नवा हुरुप यायचा. सरांच्या मार्गदर्शनामुळेच अभ्यासक म्हणून माझी जडणघडण झाली आहे.

“गावगाडा”ची शताब्दी आवृत्ती संपादित करून सरांनी उत्तम संपादनाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. रामकृष्ण मठातर्फे विवेकानंद चरित्र प्रसिद्ध झाले त्याचा अनुवाद सरांनीच केला आहे. भाषेचा अभ्यास, वाङ्मयेतिहास, समीक्षा, संशोधन, भाषांतर आणि त्याचबरोबर “गंमत शब्दांची” आणि “भयंकर सुंदर मराठी भाषा” सारखी ललित पुस्तके एवढा मोठा व्यापक आवाका सरांच्या अभ्यासक्षेत्राचा आहे. असे सर आम्हाला गुरू म्हणून लाभले आहेत हे आमचे अहोभाग्यच!

- डॉ. स्वाती कर्वे