पुंडे सर - पुस्तके

शताब्दी आवृत्ती, त्रिंबक नारायण आत्रे, संपा. डॉ. द.दि.पुंडे, राजहंस प्रकाशन (२०१५)

त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या गावगाडा या बहुचर्चित ग्रंथाची शताब्दी आवृत्ती डॉ.पुंडे यांनी संपादित केली आहे. मूळ संहितेखेरीज महत्त्वाची समकालीन समीक्षा,धनंजयराव गाडगीळ, स.ह,देशपांडे.सुमा चिटणीस अशा नामवंत अभ्यासकांनी केलेली सामाजिक - आर्थिक चिकित्सा, याशिवाय मिलिंद बोकील,नीरज हातेकर,राजन पडवळ, सदानंद मोरे इ. चे अभ्यासपूर्ण विशेष लेख यातून हा ग्रंथ आकाराला आला आहे.पुंडे यांची दीर्घ आणि विवेचक प्रस्तावना हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य ठरते.परिशिष्टात जीवनपट, गावगाडा परिघातील काही ग्रंथ, आत्रे यांचे हस्ताक्षर आणि गावगाडा ग्रंथसन्मान याचा समावेश आहे. ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र,समाजशास्त्र शेतीशास्त्र या क्षेत्रातील अभ्यासकांना उपयुक्त तर आहेच याशिवाय गाव प्रशासनातील सर्व घटक,त्यांचे कार्य समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

विचारयात्रा; संपा. गो.म. कुलकर्णी, दत्तात्रय पुंडे; मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे; फेब्रु., १९९७.

इ.स.१९२० नंतरच्या साहित्यिक-समीक्षकांच्या पिढीतील वामन मल्हार जोशी हे एक महत्त्वाचे नाव. त्यांचे लेख अनेक संग्रहांमधून प्रकाशित झालेले असले तरी, त्यांचे नियतकालिकांमधील पुष्कळसे मार्मिक लेख असंग्रहित होते. असे काही समीक्षालेख, भाषिक चिकित्सा करणारे काही लेख, काही आत्मपर लेख व दोन मुलाखती (पैकी एक त्यांनी स्वत:च टोपणनावाच्या बुरख्याआडून लिहिलेली) असा ऐवज संपादकद्वयीने सदर पुस्तकातून एकत्रित प्रसिद्ध केला आहे. वामन मल्हारांची साहित्य आणि समीक्षाव्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी त्यातून स्पष्ट होते, त्याचबरोबर त्यांच्या काही अलक्षित पैलूंवरही प्रकाश पडतो.

स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीमहोत्सवानिमित्त काही उपक्रमांमधील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे द.दि.पुंडे यांनी अनुवादित केलेले स्वामी निखिलानंद लिखित विवेकानंद जीवनचरित्र होय. प्रस्तुत चरित्र हे एका सच्च्या कार्यकर्त्याचे कार्यचरित्र आहे. कारण विवेकानंद यांचे जीवन म्हणजेच त्यांचे कार्य होय. पुंडे गेली अनेक वर्षे रामकृष्ण आश्रमाशी जोडलेले आहेत. काही वर्षे आश्रमाच्या प्रकाशन विभागाचे काम ते पाहात होते. त्यामुळे प्रस्तुत चरित्राचा अनुवाद म्हणजे एका भक्ताने दिलेली मानवंदना आहे असे म्हणता येईल.

डॉ.चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या गौरवार्थ तयार करण्यात आलेल्या या ग्रंथात भारतीय साहित्याच्या संकल्पनेची चर्चा चिकित्सा अनेक अंगांनी करण्यात आलेली आहे.ही संकल्पना भारतातील बहुभाषिक साहित्यिकांना ओळख देणारी आहे. भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट भूभागातील मानवी जीवनपद्धतीचे किंवा संस्कृतीचे सत्त्व, गाभा म्हणजे भारतीयत्व होय. भारतातील प्रत्येक साहित्याचा भारतीयता हा एक कार्यकारी आणि गुणात्मक असा सेंद्रिय घटक आहे.अशी चिकित्सा रा.ग.जाधव,अशोक बाजपेयी,र.बा.मंचरकर,नागनाथ कोत्तापल्ले इत्यादी मीमांसकांनी केली आहे.

या पुस्तकात डॉ. पुंडे यांच्या तेरा समीक्षालेखांचा समावेश आहे. मराठी साहित्यातील विविध कवी, लेखक व त्यांच्या लेखनकृती या संदर्भातील समीक्षा करणारे हे लेख आहेत. तसेच साहित्य - संस्कृतीशी संबंधित विषयांवर उपस्थित होणाऱ्या  समकालीन मुद्यांचा उहापोह करणारेदेखील काही लेख या पुस्तकात आहेत.मराठी संशोधकांसाठी मार्गदर्शक म्हणून हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे.

कोणत्याही वाङ्मयप्रवाहामध्ये आपल्या इतिहासपरंपरेविषयीची सुप्त का होईना, एक जाणीव अस्तित्वात असते. या जाणिवेची घडण, तिच्यातील स्थित्यंतरे, यादरम्यान उद्भवणारे ताण, अंतर्विरोध, विविध प्रकारचे पेच हा सर्व बारकाईने अभ्यासण्याचा विषय आहे, हे आता स्पष्ट होत गेले आहे. मराठीमध्ये या दृष्टीने गेल्या शतकभरात पुष्कळच विचारमंथन झाले आहे. परंतु, हा स्वतंत्र अभ्यासविषय आहे हे लक्षात घेऊन वाङ्मयेतिहासाच्या संकल्पनेची ऐतिहासिक आढाव्यासह विविधांगी चर्चा भारतीय भाषांमध्ये प्रथम याच ग्रंथात झाली. या विषयाकडे पाहण्याची तात्त्विक भूमिका आणि उपयोजनातील विविध प्रश्न यांची कल्पना यातील तज्ज्ञ विद्वानांच्या मांडणीतून येते.

मराठीचे उच्च शिक्षणाच्या स्तरावरील अध्यापन हे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या स्थापनेनंतर खूपच विस्तारले. त्याची परंपराही दीर्घ असली तरी त्याच्या अध्यापनशास्त्राचा सैद्धांतिक व व्यावहारिक विचार पुरेसा झालेला नाही. शिक्षणशास्त्राच्या कक्षेत प्रामुख्याने शालेय शिक्षणच होते. ही उणीव भरून काढण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. वसंत दावतर, म.सु.पाटील, सीताराम रायकर, दिगंबर पाध्ये अशा अनेक दिग्गजांनी आपापल्या दीर्घ अनुभवाच्या आधारे अध्यापनाशी संबंधित विविध अंगांची चर्चा करीत केलेले मार्गदर्शन हे अध्यापनप्रक्रिया समृद्ध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी आणि साहाय्यकारी आहे.

साहित्येतिहास ही कोणत्याही भाषेतील साहित्याभ्यासाची एक महत्त्वाची शाखा आहे. मात्र भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये कोणत्याही एका भाषेचा इतिहास अलगपणाने विचारात घेता येत नाही, त्याला अखिल भारतीय संदर्भ असतो. या दिशेने अभ्यास करू पाहताना कोणकोणत्या प्रश्नांची दखल घेणे गरजेचे आहे, भाषा, साहित्य आणि सामाजिक विकासाचा इतिहास यांचे धागे एकमेकांत कसे गुंफलेले असतात, याची चर्चा डॉ. रामविलास शर्मा यांच्या मूळ हिंदीतील या ग्रंथात आहे. या महत्त्वाच्या ग्रंथाचे सटीप भाषांतर डॉ.द.दि.पुंडे आणि डॉ.पद्मजा घोरपडे यांनी केल्यामुळे मराठीत एक मोलाची भर पडली आहे.

कै.मोतीबुलासा यांनी लिहिलेला आधुनिक मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास ‘सुविचारसमागम’ या त्यांच्याच संपादकत्वाखाली निघणाऱ्या मासिकात इ.स.१८९८ ते १९०० या काळात क्रमश: प्रसिद्ध झाला. त्याकाळी ‘मराठी भाषेची सद्य:स्थिती’ या नावाने ७ लेखांमधून प्रसिद्ध झालेली ही लेखमाला ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची असूनही मोती बुलासांच्या अकाली निधनामुळे दुर्लक्षितच राहिली. ती डॉ. द.दि.पुंडे यांच्या वाङ्मयेतिहासाचा साक्षेपी वेध घेणाऱ्या नजरेने बरोबर टिपली आणि त्यामुळे या घटिताचे महत्त्व उलगडून दाखविणाऱ्या, संबंधित अनेक संदर्भ पुरविणाऱ्या त्यांच्या प्रस्तावनेसह हा इतिहास पुस्तकरूपाने अभ्यासकांना उपलब्ध झाला आहे.

कुसुमाग्रजांसारखे कलावंत आपल्या आगळ्यावेगळ्या कृतींद्वारा समीक्षकांपुढे आव्हाने उभी करतात.ही वेगळी आव्हाने स्वीकारत त्यांच्या कादंब-यांची ,एकांकिकांची आणि ललित लेखनाची समीक्षा या ग्रंथात केली आहे.त्यांच्या काव्याचा आढावा घेऊन कुसुमाग्रजांची नवकाव्याविषयीची कल्पना स्पष्ट केली आहे.एवढेच नाहीतर त्यांच्या कथालेखनाबरोबरच त्यांचा भाषाविचार, साहित्यविचार यांचा शोध घेत घेत द.दि. पुंडे कुसुमाग्रजांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात.या शोधवाटेत बालसाहित्याचाही समर्थ मागोवा घेतला आहे.

साहित्याची व साहित्यविषयक प्रश्नांची स्वतः च्या दृष्टीने निरीक्षणे करण्याची ताकद पुंडे यांच्या या ग्रंथात प्रत्ययास येते.श्री.म.माटे, वामन मल्हार जोशी ,पु.ल.देशपांडे, शांता शेळके,जयवंत दळवी,कुसुमाग्रज इत्यादी साहित्यिकांच्या कलाकृतींची महत्त्वाची निरीक्षणे यात अंतर्भूत आहेत.वामन मल्हारांची जीवनदृष्टी शोधताना डॉ.पुंडे तत्कालीन सामाजिक संदर्भाला हेतुतः केंद्रस्थानी ठेवतात तर माटे यांच्या कथेच्या रूपाचा विचार करताना चरित्रात्मक तपशीलाकडे वळतात. साहित्यकृतींच्या केवळ रसात्मक समीक्षेपाशी न थांबता स्वतः ची आकलने सिद्ध करतात.

कलाकृतीच्या माध्यमातून कलावंताच्या मनाकडे प्रवास करावयाचा ही डॉ. पुंडे यांच्या संशोधनची पद्धत आहे.या संग्रहातील प्रत्येक लेखामागे कुसुमाग्रजाच्या प्रतिभेचा उगम आणि विकास शोधण्याचे सूत्र आहे.नाटक या विभागातील सर्वच लेख शिरवाडकरांच्या नाट्यसृष्टीसंबंधी नवदृष्टी देणारे आहेत.कुसुमाग्रजांचे भावपोषण त्यांच्या पत्रकारितेच्या दिवसात कसे झाले याचा वेध घेणारे लेख महत्त्वाचे आहेत.कवितेचे अध्यापन कसे करावे याचे नेटके दिग्दर्शन कुसुमाग्रजांच्या कवितांच्या आधारे केले आहे.ग्रंथाला जोडलेली सूची मार्गदर्शक आहे. डॉ. द.दि.पुंडे हे कुसुमाग्रजांच्या साहित्याचे साक्षेपी अभ्यासक आहेत याची जाणीव यातून होते.

वामन मल्हारांचा "विचार यात्रा“ हा एक ग्रंथ संपादित केल्यानंतरही उरलेल्या साहित्यातील मौलिक विचार एकत्रित करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती झाली. आजच्या मराठी वाड़मयीन संस्कृतीला वामन मल्हारांच्या चिंतनशीलतेची गरज आहे ,म्हणून हा ग्रंथ संपादित केला आहे. आपल्या मांडणीतून गो.म.कुलकर्णी यांनी सत्य-सौजन्य-सौंदर्य या त्रिस्थळीची पुनःस्थापना केली. वाड़्मयातील नवनैतिकतेच्या संदर्भातील वामन मल्हारांची ही भूमिका या ग्रंथातून संपादकांनी दर्शविली आहे.

प्राध्यापक रा.श्री. जोग यांच्या या संपादित लेखसंग्रहाचे सूत्र वाड़्मयाचा विमर्श हेच आहे.यांतून जोगांचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते.प्रा.जोग ही एक व्यक्ती नव्हती,तर तो एक विचार होता.ती विचारसरणी वाचकांच्या लक्षात येते. ददि. पुंडे यांच्या संपादनाचे ते वैशिष्ट्य आहे.

दिवाळी अंकांमधील निवडक उत्तम साहित्य नंतरही वाचकांना उपलब्ध असावे, ते तात्कालिक ठरू नये, या हेतूने त्याचे संपादित ग्रंथरूप प्रसिद्ध करण्याचा उपक्रम काही वर्षे चालला. विविध कारणांनी तो पुढे चालू शकला नाही, तरीही गो.म.कुलकर्णी, शांता शेळके, अरुणा ढेरे, चंद्रकांत बांदिवडेकर, दत्तात्रय पुंडे यांनी संपादित केलेले इ.स.१९८४ च्या दिवाळी अंकामधले साहित्य त्यावर्षीच्या मौलिक साहित्याची भेट घडवते, त्याबरोबरच या उपक्रमाचाही परिचय देते.

प्रा. मु.श्री. कानडे यांच्या निवृत्तीनंतर (त्यांच्या ‘कालचे नाटककार’वरून प्रेरणा घेऊन) ‘आजचे नाटककार’ हा गौरवग्रंथ सिद्ध करण्याच्या त्यांच्या विद्वान मित्रांच्या बेतानुसार इ.स.१९९५ मध्ये समकालीन नाटककारांवरील हा विविध अभ्यासकांच्या लेखांचा संग्रह प्रकाशित झाला. वि.वा.शिरवाडकरांपासून सतीश आळेकरांपर्यंतच्या नाटककारांचा परामर्श यात घेतला गेला आहे. त्याचबरोबर साठोत्तर संगीत नाटकांवरील श्रीरंग संगोराम यांचा लेख व माधव वझे- द.दि.पुंडे यांचा नाट्यविषयक दीर्घ संवाद हाही यातील उद्बोधक भाग आहे.

वाङ्मयाचा आणि अन्य कलांचा अभ्यास करणाऱ्यांना त्याला प्रेरक ठरणाऱ्या विचारप्रणालींचा- वादांचा- संदर्भ अनेकदा लक्षात घ्यावा लागतो. अभिजातवाद वा सौंदर्यवाद यासारखे काही मोजके वाद वगळता अभिव्यक्तिवाद, गूढवाद अशा कित्येक वादांची माहिती मराठीमध्ये आढळत नाही. गो.म.कुलकर्णी यांच्या गौरवार्थ निघालेला हा ग्रंथ अशा विविध वादांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सैद्धांतिक दृष्टी उलगडून दाखविणारा आहे, काहींचा मराठी साहित्याशी संबंधही स्पष्ट करणारा आहे. त्या त्या विचारप्रणालींचा दीर्घकाळ व्यासंग असलेल्या, साहित्य, कला व सामाजिक शास्त्रांच्या विद्वानांच्या लेखांचे हे संपादन एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरले आहे.

लेखक – डॉ. कल्याण काळे, डॉ. दत्तात्रय पुंडे

१९८३-८४ या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठात प्रथम वर्ष वाणिज्य व द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गांसाठी ‘व्यावहारिक मराठी’ हा विषय सुरू करण्यात आला.हा अभ्यासक्रम लक्षात घेऊन हे पुस्तक लेखकद्वयाने लिहिलेले आहे. त्यात या विषयाचे अभ्यासक्रमानुसार १. भाषिक नैपुण्ये व २. संज्ञापन नैपुण्ये असे दोन भाग करण्यात आले आहेत.
पुस्तकाच्या पहिल्या भागात भाषांतर, सारांशलेखन व निबंधलेखन यांची सविस्तर माहिती आहे. दुसऱ्या भागात कार्यालयीन संज्ञापन, जाहिरात मसुदा लेखन, स्मरणिका, व मुलाखत, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठीचा वापर या विषयांबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. सुबोध भाषेत लिहिल्याने हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे.

संपादक प्रा.गणेश अग्निहोत्री / प्रा. दत्तात्रेय पुंडे

वाड्मय परिषद या संस्थेकडून घेतली जाणारी साहित्य संमेलने हे मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.जिथे जिथे मराठी भाषक आहेत, त्यांच्यात मराठी भाषेविषयी आस्था आहे आणि मराठी साहित्याविषयी प्रेम आहे, त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.मराठी वाड्मय परिषद,बडोदे ही त्यात अग्रणी संस्था आहे.या संस्थेची स्थापना इ.स. १९३१ मध्ये झाली.महाराज सयाजीराव गायकवाड हे त्या संस्थेचे अध्वर्यू होते.त्यांच्या प्रेरणेने हे साहित्यिक कार्य सुरू झाले.

या संस्थेच्या स्थापनेपासून २००० सालापर्यंतच्या साहित्य संमेलनातील ५८ अध्यक्षीय भाषणाचे हे संपादन आहे. भाषा,साहित्य,संस्कृती व समाज याबाबत सखोल विचारमंथन या भाषणातून झालेले आहे.यातील साहित्यिक हा निवडणूक घेऊन नव्हे तर एकमताने निश्चित केला जात असे.या संस्थेने इतका गौरव संपादित केला होता की त्याकाळातील अनेक साहित्यिकांनी तिथे आपले वैचारिक योगदान दिले आहे. त्यात न.चिं. केळकर, वरेरकर, सावरकर, फडके, खांडेकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल.देशपांडे, पु.ग. सहस्त्रबुद्धे यांच्यापासून ते भालचंद्र नेमाडे, दि.पु. चित्रे, शांता शेळके, शंकर वैद्य अशा विचारवंतांचा समावेश होता.येथील  सर्व भाषणे एकूण भाषा व साहित्य यासंबंधी विचार मांडणारी होती.त्यांच्या कक्षा प्रांतिकतेने किंवा स्थानिकतेने मर्यादित झालेल्या नव्हत्या हे लक्षात घेऊन संपादकांनी हा ग्रंथ संपादित केला आहे.

सुरुवातीला वाड्मय परिषदेचा इतिहास व कार्य त्यानंतर वाड्मयेतिहासाच्या अंगाने या संमेलनातील घटना,प्रस्तावना,संपादन व संशोधनाविषयी माहिती, परिषद अध्यक्षांचे व प्रकाशकाचे मनोगत असे ग्रंथाचे स्वरूप आहे. त्यानंतर सर्व अध्यक्षांची क्रमवार भाषणे,भाषणाच्या सुरुवातीला साहित्यिकाचे फोटो व जन्म- मृत्यू वर्ष आहे. परिशिष्टात बडोदे संमेलन व अ.भा.साहित्य संमेलन यांचा तौलनिक तक्ता आहे.या परिषदेची काही वैशिष्ट्येही उलगडली आहेत.शेवटी निर्देशसूची आहे.यामुळे ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढलेले आहे.

आंध्र-कर्नाटकात अगदी प्रारंभापासून मराठी वाङ्मय निर्माण होत राहिले. प्रामुख्याने धर्मसंप्रदायाच्या अंगाने आकारत गेलेले हे वाङ्मय महाराष्ट्रातील मराठी वाङ्मयाशी ऐतिहासिकदृष्ट्या अनुबंधित करण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. म्हणजे आंध्र-कर्नाटकातील ज्या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाची आजवर संशोधन-समीक्षेच्या अंगांनी सुटी सुटी चर्चा होत राहिली होती ते वाङ्मय आणि या प्रांतातील अलक्षित राहिलेले असे बरेचसे मराठी वाङ्मय एकत्रितपणे विचारात घेऊन प्रस्तुत खंडातील लेखकांनी आपापले लेख लिहिलेले आहेत.

शीर्षकातच पुस्तकाचे मर्म दडले आहे. मराठी आपली मातृभाषा पण बोलताना न जाणवणारे अनेक हिसके, आडवळणे, सरावाने केले जाणारे चुकीचे उच्चार, गोंधळात टाकणारी मराठीतील संक्षिप्त रूपे यांचे मार्मिक दर्शन येथे घडते. नवी दृष्टी देते.

वर्णनात्मक भाषाविज्ञान या अभ्यासशाखेचा परिचय करून देणारा हा तीन विद्वानांनी मिळून लिहिलेला ग्रंथ आहे.  भाषेचा रूपिम व वाक्य विचार, भाषेचे उच्चारण आणि लेखन हे तीन लेख डॉ. पुंडे यांनी स्वतः लिहिलेले आहेत. प्रमाणभाषा, मराठी बोलींचा परिचय, मराठीचा शब्दसंग्रह या अन्य लेखांमुळे हा भाषाभ्यास परिपूर्ण झाला आहे.

शब्दांच्या गमती-जमती उलगडणारे पुस्तक. मुख्यत: बालवाचकांसाठी लिहिलेले, पण सर्वांनाच रस वाटेल असे. भाषाविषयक चिंतन करणारे. भाषेत संथपणे होणारे बदल, भाषेतून नाहीसे होणारे शब्द, परभाषेतून घेतलेले शब्द व त्यांचे लिंग याविषयी हे पुस्तक बोलते. शब्दांच्या गमतीला भावनिक डूब देते.

ही सुधारित आवृत्ती आहे. या आवृत्तीचा विशेष म्हणजे यात शेवटी शब्दसूची दिली आहे जेणेकरून मुलांची शब्दांशी ओळख होईल.

हे पुस्तक मराठी भाषेचे वर्णनात्मक पद्धतीने सुबोध विवेचन करते. 'स्वनिम' भाषेतील मूलघटक. त्यापासून रूपिम (शब्द) व वाक्य तयार होतात. मराठीतील अशा रचनांचा विचार येथे केला आहे. प्रमाणभाषा, बोली, भाषेचे उच्चारण व लेखन या विषयांची जोड दिली आहे.

यशवंत सुमंत, डॉ. द. दि. पुंडे

१८५० च्या आसपासून गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षे या कालावधीत जातीसंबंधाने महाराष्ट्रात अगदी सातत्याने या ना त्या स्वरूपाचे विचारमंथन होत राहिले, ही गोष्ट द. दि. पुंडे यांना जाणवली. म्हणूनच कै. प्रा. श्री. म. माटे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य ध्यानात घेऊन त्यांनी मॉडर्न महाविद्यालयात 'महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार' ह्या विषयावर एक चर्चासत्र घेतले. त्यात सादर केलेल्या निबंधाचे पुस्तक त्यांनी त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉ. सुमंत यांच्या साहाय्याने संपादित केले.. या ग्रंथात लोकहितवादी, महात्मा फुले यांच्यापासून थेट इरावती कर्वे, शरद पाटील यांच्यापर्यंतच्या २० विचारवंतांनी केलेल्या जातिविचारांचे परीक्षण-समीक्षण असणारे चर्चात्मक लेख आहेत. हे लेख डॉ. य. दि. फडके, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. उत्तम भोईटे, डॉ. ज. रा. शिंदे, डॉ. स. ह. देशपांडे डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरविंद देशपांडे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सदानंद मोरे इत्यादी विद्वानांनी लिहिलेले आहेत. हा ग्रंथ पुरोगामी विचाराच्या अभ्यासकांबरोबरच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणारा आहे.

डॉ. सुरेश धायगुडे, डॉ. द. दि. पुंडे

साहित्य आणि समाज यांच्या परस्परसंबंधाबाबत बोलताना गेली काही दशके मराठी साहित्याचे अभ्यासक व अध्यापक तेनच्या सिद्धांताची चर्चा करीत आले आहेत. मात्र नेमका हा विचार काय आहे, हे खोलात जाऊन तपासले गेले नव्हते. मूळ फ्रेंचमध्ये झालेली ही मांडणी इंग्रजीत आली असली तरी मराठीत आलेली नव्हती. प्रस्तुत पुस्तकाद्वारे तेनच्या सिद्धांताचे यथामूल व सुविहित भाषांतर प्रथमच मराठीत आले आहे. मराठीबरोबर हिंदी व इंग्रजीच्या अभ्यासकांनादेखील हे भाषांतर उपयोगाचे ठरेल.