काळे सर - पुस्तके

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्याचे हंसराज स्वामी (इ.स.1805 ते 1855 ) हे समर्थ संप्रदायातील होते. त्यांनी हंससंप्रदाय सुरू केला.मूळ परभणीचे असलेले स्वामी (मूळ नाव- नारायण) बिकट परिस्थितीतून मार्ग काढत भ्रमंतीनंतर परंड्याला स्थिरावले. संप्रदायाचे प्रणेते झाले. वेदान्त ही त्यांची केवळ बौद्धिक गरज नव्हती तर जीवननिष्ठा होती. उपेक्षित राहिलेल्या या संतकवीचा अभ्यास येथे केलेला अाहे.

हंसराजस्वामींच्या सोळा ग्रंथांचे निरूपणात्मक आणि आख्यानात्मक असे दोन भाग पडतात. सटीकामृतानुभव, सदाचार, कथाकल्पलता, चूडालाख्यान,वेदेश्वरी इत्यादी ग्रंथांपैकी वेदेश्वरी हा महत्त्वाचा आहे. डॉ.काळे यांनी यातल्या दहा ग्रंथाचे संपादनही केलेले आहे.

प्रमोदसिंधू हा  इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेतील संशोधनपर लेखांचा संग्रह असून तो कल्याण काळे यांनी, प्रा. प्रमोद गणेश लाळ्ये यांच्या पंचाहत्तरीनिमित्त संपादित केला आहे. हे लेख वेद,पुराणे आणि संस्कृत साहित्याचा विविध दृष्टिकोनांमधून परामर्श घेणारे आहेत. काळे यांनी भारतातील अनेक विद्वानांचा त्यात समावेश केला आहे. त्याच्या स्वरूपामुळे तो विद्वतमान्य ठरला आहे.

लेखक – डॉ. कल्याण काळे, डॉ. दत्तात्रय पुंडे

१९८३-८४ या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठात प्रथम वर्ष वाणिज्य व द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गांसाठी ‘व्यावहारिक मराठी’ हा विषय सुरू करण्यात आला. तो अभ्यासक्रम लक्षात घेऊन हे पुस्तक लेखकद्वयाने लिहिलेले आहे. व्यावहारिक मराठी या विषयाचे अभ्यासक्रमानुसार १. भाषिक नैपुण्ये व २. संज्ञापन नैपुण्ये असे दोन भाग करण्यात आले आहेत.
पुस्तकाच्या पहिल्या भागात भाषांतर, सारांशलेखन व निबंधलेखन यांची सविस्तर माहिती आहे. दुसऱ्या भागात कार्यालयीन संज्ञापन, जाहिरात मसुदा लेखन, स्मरणिका, व मुलाखत, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठीचा वापर या विषयांबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. हे पुस्तक अतिशय सुबोध भाषेत लिहिल्याने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे.

लर्निंग मराठी हे अ -मराठी भाषकांच्या करिता डॉ. कल्याण काळे व डॉ. अंजली सोमण यांनी तयार केलेले पाठ्यपुस्तक अनेक कारणांसाठी वेगळे उठून दिसते. मुख्य गोष्ट म्हणजे या पाठ्यपुस्तकांची निर्मिती लेखकद्वयाने आदर्श पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीविषयक तत्त्वांना धरून केलेली आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने अ -मराठी लोकांसाठी मराठी भाषा शिक्षण वर्ग सुरू केले होते. त्या वर्गात काळे व सोमण यांनी सलग दोन वर्षे दोन तुकड्यांना शिकविताना केलेल्या एका सर्वांगसुंदर अध्यापन प्रयत्नांचे फळ म्हणजे हे पाठ्यपुस्तक होय. प्रत्येक पाठाच्या वेळी ते अ-मराठी विद्यार्थ्यांच्या हातात त्या दिवशीचा अध्ययनपाठ लिखित स्वरूपात देत व मग अध्यापन करीत. साहजिकच विद्यार्थ्यांची अध्ययनात गुंतवणूक होऊन ते आपल्या शंका, अडचणी इत्यादी व्यक्त करीत. त्या लक्षात घेऊन उभय लेखकांनी लेखी पाठ अद्ययावत् केले व त्यांचे पुस्तक प्रकाशित केले. शिक्षणशास्त्रात अशा पुस्तकाला 'चाचणी घेतलेले पुस्तक' (Tried out book) म्हणतात. या पुस्तकाची आणखी एक विशेषता म्हणजे मराठी भाषेच्या व्याकरणिक आधाराने, तांत्रिक पद्धतीने रूक्षपणे पाठ तयार न करता सर्व पाठ दैनंदिन जीवनातील प्रसंगांच्या निवेदनाच्या आधारे तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक स्वारस्यपूर्ण वाटते.

डॉ. मु.श्री.कानडे गौरव ग्रंथ म्हणून सहकार्याने संपादित केला आहे.संतसाहित्याचा वाड़मयीन अभ्यास करताना या साहित्याचे अन्य साहित्याशी असणारे अनुबंध लक्षात घेतले पाहिजेत हे डॉ. सुहासिनी इर्लेकरांनी सांगितले आहे तर संतसाहित्याचा अभ्यास करताना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाड़मयीन पर्यावरणाचा विचारही महत्त्वाचा असतो असे मंचरकरांनी विशद केले आहे.मध्ययुगीन संस्कृतीचा समाजशास्त्रीय दृष्टिक्षेपातून अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन गो.म.कुलकर्णी यांनी केले आहे. कल्याण काळे यांनी भाषिक अंगे उलगडून दाखविली आहेत. तत्त्वज्ञानाची बाजू किती महत्त्वाची आहे हे तळघट्टी यांच्या लेखातून स्पष्ट होते. या ग्रंथामध्ये 1845 ते 1992 पर्यंतची संतवाड़्मय विषयक महत्त्वाच्या लेखनाची सूची दिली आहे. संशोधकांना साहाय्यभूत असा ग्रंथ आहे.

अध्यापनात आधुनिक भाषाविज्ञानाचा समावेश झाल्यावर त्यासाठी तयार झालेले वर्णनात्मक पद्धतीवरील लेखांचे मराठीतील आरंभीचे पुस्तक. भाषावैज्ञानिक अभ्यासाची क्षेत्रे मांडणारे विविध लेख. डॉ. विजया देव, डॉ.दिलीप धोंडगे, डॉ. शैलेश पुंडलिक या नव्या भाषा अभ्यासकांनी स्वनिम, पदिम, अर्थ या संकल्पनांवर आणि डॉ. सु. बा. कुलकर्णी यांनी बोलीभाषांच्या अभ्यासपद्धतीवर ग्रंथात लेखन केले आहे.

वर्णनात्मक भाषाविज्ञान याचे शास्त्रीय विवेचन करणारे संपादित पुस्तक. वाक्यविन्यास (विचार) प्रक्रियेचा समग्र परिचय करून देणारा दीर्घ लेख. प्रा. मिलिंद मालशे, डॉ. विजया चिटणीस माडगूळकर, प्रा कृष्ण श्री. अर्जुनवाडकर इत्यादी भाषावैज्ञानिकांच्या लेखांमुळे पुस्तक महत्त्वपूर्ण. स्वनिम/ पदिम / वाक्य/ यांच्या आंतरसंबंधांचे विवरण.

प्रसिद्ध भाषावैज्ञानिक डॉ. अशोक केळकर यांनी स्थापन केलेल्या 'मराठी अभ्यास परिषद' या संस्थेचे ' भाषा आणि जीवन' हे मुखपत्र. लिंग, वय, व्यवसायानुसार दिसणारे भाषाभेद, अपशब्द, लोकशिक्षण, संगीत, कायदा इत्यादी विविध विषयातील संपादित भाषाविषयक लेखन भाषा आणि जीवन यातील निकटत्व सिद्ध करते.

अक्षर सुवाच्य आणि वळणदार असावे, असे प्रत्येकाला वाटते, परंतु, ते तसे आपोआप होत नाही. प्रत्येक अक्षराची सुरुवात कोठे करावी आणि कोणत्या दिशेने पुढे जावे म्हणजे योग्य वळण मिळते, याचे दिग्दर्शन करणारी ही पुस्तिका नव्याने लिहू लागलेल्या कुणालाही उपयुक्त आहे.

लेखक- शं.बा.जोशी; संपादक - डॉ. कल्याण काळे

धारवाड येथील शं.बा.जोशी हे कर्नाटकमधील एक प्रसिद्ध अभ्यासक होते. प्रामुख्याने त्यांचे लेखन कन्नडमधून आणि दाक्षिणात्य संस्कृतीसंबंधीचे असले तरी त्यांनी मराठीतूनही लेखन केले होते. वैदिक संस्कृतीसंबंधीची त्यांची मते वेगळी असली तरी महत्त्वाची होती. मराठी वाचकांसाठी त्यांचा हा संपादित ग्रंथ त्यामुळे महत्त्वाचा आहे.

काळे सरांसंबंधी

संपादक – अंजली जोशी व विनायक गंधे

डॉ. कल्याण काळे हे मराठी साहित्यातील शैलीविज्ञान व भाषाविज्ञान या विषयांचे तज्ज्ञ. त्यांनी केलेल्या दीर्घ अभ्यासातून व चिंतनातून शैलीविज्ञान व भाषाविज्ञान या दोन विषयात त्यांच्या द्वारे केलेल्या लेखनातून फार मोलाची भर पडली आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा उपयोग झाला आहे.

डॉ. काळे यांच्या विद्यार्थ्यांनी व सुह्र्द मंडळींनी आपले विविध विषयांवरील समीक्षालेखन एकत्र करून हे पुस्तक त्यांना ‘पुनर्भेट’ स्वरूपात अर्पण केले आहे.